मुंबई : मनसेकडून शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवात कार्यक्रमात संध्याकाळी 7 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालय आणि सरकारने 8 ते 10 फटाके वाजवण्याची मुभा दिलेली असताना, मनसेच्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालय आणि सरकारच्या निर्णयाचं उल्लंघन केल्याचं समोर आलं. मात्र मनसेनं आपली बाजू मांडताना आमची दिवाळी दोन दिवसांनंतर सुरु होणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं.
हिंदू धर्मात दिवाळी धनत्रयोदशीपासून सुरू होते. त्यामुळे आज दिवाळी नाही. आम्ही आज फटाके फोडले, मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिवाळीपासून लागू होत आहे, असा युक्तीवाद मनसेकडून करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरही हजर होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये फटाके वाजवण्यासाठी कोणत्याही तारखेची बंधनं घातलेली नाही. त्यात फक्त दिवाळीच्या दिवसांमध्ये दोनच तास फटाके वाजवा, असा आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे दिवाळीची सुरुवात ही वसुबारसेच्या दिवसापासून धरावी की धनत्रयोदशीपासून धरावी, असा पेच पोलिसांसमोर येणार आहे.
दिवाळीत होणारं ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी देशभरात फटाक्यावर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यासाठी रात्री 8 ते 10 ही वेळ निर्धारित केली होती. तसेच या दोन तासाची परवानगी कुठल्या वेळेत द्यायची याबाबत राज्य सरकारला अधिकार दिले होते. मात्र या निर्णयाबाबत आता संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.
संबंधित बातम्या
या अटींवर सुप्रीम कोर्टाकडून दिवाळीत फटाके वाजवण्यास परवानगी
फटाके फोडण्याचे दोन तास राज्य सरकारने ठरवावेत: सर्वोच्च न्यायालय