मुंबई :  राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा 'मातोश्री' वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंशी एक तास चर्चा केली. आव्हाड यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण ठाकरे यांना दिल्याची माहिती आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे पहिले आमंत्रण शरद पवार यांना दिले आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिले आहे. ठाकरे यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना आमंत्रण दिले जाणार आहे.


कालच अजित पवार यांनी महाघाडीत शिवसेना येण्याचा प्रश्न नाही हे स्पष्ट केलं होतं, त्यानंतर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 20 दिवसांपूर्वीच आव्हाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी या दोघांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली होती. मात्र या दोघांची भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

आव्हाड हे विरोधी पक्ष अर्थात राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आहेत. त्यांनी सातत्याने शिवसेना-भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. विशेषत: शिवसेनेच्या भूमिकेवर ते नेहमीच सडकून टीका करतात. शिवाय सामनातूनही आव्हाडांवर बोचरे वार केले जातात.  मात्र तेच जितेंद्र आव्हाड एका महिन्याभरातच दोनदा‘मातोश्री’वर गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या जवळचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीच्या दृष्टीने काँग्रेसशी चर्चा सुरुच आहे. शिवाय भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याबाबतची भूमिका पवारांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आव्हाड-ठाकरे भेट होती का? असा प्रश्न  आहे.