मुंबई : गरजू रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळावेत, या अनुषंगाने कोहिनूर रूग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. संजय हेलाले यांनी एकाच दिवशी 20 रूग्णांवर विभिन्न प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च एचसीपी (HCP-ENT) या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने कानाचा पडदा फाटणे, कानाचे हाड खराब होणं, थायरॉईड यांच्यासारख्या शस्त्रक्रिया रूग्णांवर करण्यात आल्या आहेत.


कानाचे उद्भवणारे आजार सहसा घशामुळे होतात. या आजाराकडे नागरिक दुर्लक्ष करतात. त्यामुळे कान फुटणे, कानातून पाणी गळणे, ऐकायला कमी येणं, चक्कर येणं ही लक्षणे रूग्णांमध्ये दिसतात. परंतु, अनेक लोक डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात. वेळीच उपचार आणि निदान न झाल्यास कानाचं दुखणं वाढू शकतं. यावेळी शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण शस्त्रक्रियेचा खर्च सर्वसामान्य गरजू रूग्णांना परवडण्याजोगा नसतो, अशा स्थितीत रूग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी रूग्णालयाद्वारे विशेष उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.


कोहिनूर रूग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. संजय हेलाले म्हणाले की, "डॉक्टर हा वैदयकीय क्षेत्राचा कणा आहे. रूग्णांवर उपचार करून त्यांना बरं करणं हे डॉक्टरांचे पहिले कर्तव्य आहे. या भावनेतून संपूर्ण देशभरात डॉक्टर्स दिनानिमित्त कौतृक सोहळे साजरे केले जातात. या रूग्णालयात एकाच दिवशी दहा गरजू रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आल्या असून या शस्त्रक्रियेमुळे रूग्णांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलले आहे."


डॉ. हेलाले म्हणाले की, "बऱ्याचदा अनेक रूग्ण उपचारासाठी पैसे नसल्यानं रूग्णालयात येणं टाळतात. वेळीच उपचार न मिळाल्यानं आजार वाढू शकतो. म्हणूनच कानावरील शस्त्रक्रिया गरजू रूग्णांना कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी रूग्णालयानं काही वर्षांपूर्वी खास उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाद्वारे चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीनं रूग्णांवर परवडणाऱ्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत 10 ते 15 वर्षांत साधारणतः एक हजारांहून अधिक रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दर रविवारी सायंकाळी 4 ते 7 वेळेत बाहृयरूग्ण विभाग सुरु असतो. त्यात उपचारासाठी आलेल्या रूग्णांवर कमी दरात शस्त्रक्रिया केली जात आहे."


रूग्ण आफिया कुरेशी यांचा मुलगा माजिद कुरेशी यांनी सांगितले की, "मागील अनेक महिन्यांपासून माझ्या आईला थायरॉईडची समस्या जाणवत होती. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. परंतु, काहीच फरक दिसत नव्हता. तिच्या गळ्याला सूज आली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आम्ही तिला डॉ. हेलाले यांच्याकडे उपचारासाठी आणले. याठिकाणी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेसाठी 80,000 रूपये खर्च येणार होता. डॉक्टरांच्या मदतीमुळे 50 टक्के शस्त्रक्रियेचा खर्च चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उचलण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सहकार्य़ामुळे आता आईच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिला डिस्चार्ज मिळाला आहे."