नवी मुंबई : महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी पिकानं आता थेट शहरात प्रवेश केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. पनवेलमधील पवार कुटुंबियांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करत उत्तम पिक काढून प्रयोग यशस्वी केल्यानं पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचं आकर्षण ठरलं आहे.
स्ट्रॉबेरी म्हटलं की, आपल्या नजरेसमोर उभा राहतो महाबळेश्वर... महाबळेश्वरमधील वातावरण थंड असल्यानं तिथे मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. मात्र हे समीकरण बदलण्याचं काम केले आहे, पनवेलमधील पवार कुटुंबियांनी. शेतीमधील नवनवीन प्रयोगामुळे पवार कुटुंबियांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पारंपरिक शेतीसोडून प्रयोगशील शेती करण्याकडे सज्जन पवार, प्रशांत पवार यांचा ओढा असतो. यातूनच त्यांनी महाबळेश्वरमध्ये पिकणारी स्ट्रॉबेरी पनवेलमधील आपल्या शेतात घेण्याचा चंग केला. यासाठी कृर्षीप्रदर्शानात जावून माहिती घेतल्यानंतर महाबळेश्वरमधून 1 हजार स्विट चार्ली आणि विंटर डॉन जातीची स्ट्रॉबेरीची रोपं आणण्यात आली. उभ्या, आडव्या पध्दतीनं 25 मायक्रॉनचं मलचिंग पेपर लावून जानेवारीमध्ये थंडीत रोपांची लागवड करण्यात आली. पनवेल कृर्षी अधिकाऱ्यांनीही त्यांना मार्गदर्शन केलं. शहरी भागांतील शेतीला करोडोचा भाव मिळत असताना पवार कुटुंबियांनी ती विकण्यापेक्षा पिकविण्यात धन्यता मानल्यानं शहरातच पिकवलेल्या स्ट्रॉबेरीसारख्या फळांची चव चाखायला मिळणार आहे.
जानेवारी महिन्यात लावलेले रोपांना आता फळं येवू लागली आहेत. लाल भडक रंगांची मोठ्या आकाराची, चवीला गोड स्ट्रॉबेरीचं पिक दीड महिन्यात आल्यानं पवार कुटुंबियांच्या चेहऱ्यावर प्रयोग यशस्वी झाल्याचं समाधान आहे. 50 ते 100 ग्रॅम स्ट्रॉबेरीचं फळ आलं असून एका झाडाला 8 ते 10 फळं येत आहेत. यामुळे एक झाड 400 ते 500 ग्रॅम स्ट्रॉबेरी फळाचं उत्पन्न देवू लागले आहे. 230 ते 250 रूपये किलोला भाव मिळू लागला असल्यानं पवार कुटुंबियांना चांगले पैसे मिळू लागले आहेत.
चक्क पनवेलमधील शहरी भागांत स्ट्रॉबेरी सारख्या फळाचे उत्पन्न पवार कुटुंब घेवू लागल्यानं शासकीय दरबारीही याची दखल घेतली गेली आहे. पनवेल प्रांत अधिकारी दत्ता नवले यांनी स्ट्रॉबेरी शेतीला भेट देत पाहणी केली. या नवीन प्रयोगाबद्दल रायगड जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवून इतर शेतकऱ्यांना याबाबत आवगत करण्यासाठी शासकीय दरबारी प्रयत्न केले जाणार असल्याचं प्रांतांकडून सांगण्यात आलं आहे.