Shiv jayanti 2021 दरवर्षी 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात, इतकंच नव्हे तर सातासमुद्रापार असणाऱ्या अनेकांकडूनही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येतं. पण, यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाच्या सावटामुळं राज्य शासनानं शिवजयंती उत्सवावर अनेक निर्बंध घातले. यावरच विरोधकांनी सडकून टीका केली.


आतापर्यंत शिथिल केलेल्या नियमांच्या धर्तीवर अनेक ठिकाणी नियमांचं पालन करत काही कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं. पण, एकाएकी पुन्हा एकदा मुंबईसह काही भागांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उंचावल्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढं नवं आव्हान उभं राहिलं. परिणामी शासनाला शिवजयंती उत्सव साजरा करण्यावर अनेक निर्बंध घालावे लागले.


कोरोनाच्या दृष्टीनं संभाव्य धोका टाळण्यासाठी म्हणून हे निर्णय घेणअयात आले खरे, पण भाजपनं महाविकासआघाडीवर जोरदार टीका करत आंदोलनाचाही इशारा दिला. तिथं, भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडीसह शिवसेनेला खोचक टोला लगावला.


Shiv Jayanti 2021 : शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करु, भाजपचा सरकारला इशारा


ट्विट करत त्यांनी अजब वाटले तरी नियम पाळा, ठाकरे सरकार करेल तेच नियम आणि तेच कायदे असा टोला लगावत शेलारांनी तीव्र शब्दांत नाराजीचा सूर आळवला. भायखळा येथील जिजामाता उद्यानात पेंग्विन पाहण्यासाठीच्या सरकारच्या निमंत्रणाचा उल्लेख करत त्यांनी ठाकरे सरकारच्या या भूमिकेवर ताशेरे ओढले.





भाजपकडून आंदोलनाचा इशारा


शिवजयंती उत्सवावर निर्बंध आल्याचं जाहीर होताच भाजपनं आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला. शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला. अनेक व्यवगार सुरळीत होत असताना हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला परवानगी दिली जात नाही, मुळात शिवरायांच्याच महाराषअट्रात हे घडत आहे हीच शरमेची बाब, असं त्यांनी या पत्रात लिहिलं होतं.


दरम्यान, भाजपकडून आंदोलनाचा इशारा दिला जात असताना आणि इतरही संघटनांकडून शासनाच्या या निर्बंधांचा निषेध केला जात असताना, राज्याच्या गृह विभागाकडून पुन्हा एकदा शिवजयंती उत्सवासाठीची सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये 10 ऐवजी 100 उपस्थितांना परवानगी दिली गेल्याचं सांगण्यात आलं आहे.