CM Palghar Visit | पर्यटनाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचा विकास साधणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पालघर जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला आहे. तसेच हिल स्टेशन आणि नैसर्गिक सानिध्य लाभल्याने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पालघरचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर दौऱ्यात सांगितलं.

Continues below advertisement

पालघर : पर्यटनाच्या दृष्टीने पालघरची भौगोलिक रचना अनुकूल असून जिल्ह्याला विस्तीर्ण सागरीकिनारा लाभला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Continues below advertisement

कुपोषण पूर्णपणे थांबवायचे असल्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, "जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला आहे. तसेच हिल स्टेशन आणि नैसर्गिक सानिध्य लाभल्याने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पालघरचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे." आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपून समाजाचा विकास करण्यावर सरकारचा भर आहे. जिल्ह्यात दळणवळण, रोजगार, पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पालघर दौरा | मी घोषणा नाही करणार, पण...- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

नव्याने जिल्हा अस्तित्वात आल्याने पालघरसाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा परिषदेच्या इमारतीचे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

जव्हार दौऱ्यात कलाप्रेमी मुख्यमंत्र्यांचं दर्शन दरम्यान पालघर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी जव्हार तालुक्यातील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी प्रवेशद्वारावरील फळ्यावर लिहिलेल्या हस्ताक्षराचं कौतुक केलं. सर्व वैद्यकीय कक्षांची पाहणी केल्यानंतर तिथे काढलेले विविध रंगातील बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र पाहून मुख्यमंत्री आनंदित झाले. चित्रकार राहुल श्रीराम सहाने या विद्यार्थ्यासोबत आलेले कलाशिक्षक प्रवीण अवतार यांची चौकशी केली.

पालघर जिल्ह्यातील वारली पेंटिंग कला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यातील चित्रांना संकल्पना देऊन विविध रंगात रंगवण्यात यावी. यासाठी मुलांचे लहान गट करण्यात यावेत तसेच ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. रांगोळी कला ही चित्रकलेपेक्षा कठीण असून त्यात खूप मेहनत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी, महिला अर्थिक महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वानगा, सुनिल भुसारा, रविंद्र फाटक, कोकण विभागाचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सलीमठ, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त डी. गंगाथरण , सहाय्यक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, पी. नायर तसेच जिल्ह्यातील अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola