ठाणे : ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर वापरले जात असल्याने युवा पिढी नशेच्या आहारी जात आहे. त्यातच भिवंडीत गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल 9 कोटी 36 लाख 78 हजार 520 रुपयांचा महाराष्ट्रात प्रतिबंधित निकोटीनयुक्त 'अफजल' व 'सोएक्स हर्बल' या  हुक्का फ्लेवरचा साठा जप्त केला आहे. 


गुन्हे शाखा भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिलेल्या माहिती नुसार 6 ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहिती नुसार नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील धामणकर नाका येथील "अल्ताफ अत्तरवाला' या दुकानावर छापा टाकण्यात आला होता. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या हुक्क्याचे वेगवेगळ्या प्रकारचे 57 हुक्का फ्लेवर आहेत. त्याची किंमत 8940 रुपये आहे. ते मुद्देमाल हस्तगत करून त्या संदर्भात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सखोल तपास करताना धक्कादायक बाब समोर आली . 


भिवंडी शहर परिसरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असलेल्या हुक्क्याच्या साठ्याचा शोध घेताना गुप्त बतमीदाराने दिलेल्या माहिती नुसार दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील हरीहर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील,हायस्ट्रीट इम्पेक्स लि. मुंबई या कंपनीच्या तीन गोदामांवर भिवंडी गुन्हे शाखेच्या वतीने वपोनि अशोक होनमाने यांच्या नेतृत्वाखाली  पथकाने छापा टाकला होता. गोदामात निकोटीनयुक्त 'अफजल हुक्का फ्लेवर' चे 2862 बॉक्स आहेत. त्याची किंमत 8 कोटी 42 लाख 49 हजार 610 रुपये व 'सोएक्स हर्बल फ्लेवर' चे 375 बॉक्स ज्याची किंमत 94 लाख 28 हजार 910 रुपये असा एकूण 9 कोटी 36 लाख 78 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात भिवंडी गुन्हे शाखेस यश मिळाले आहे. 


सदरचा 'अफजल हुक्का फ्लेवर' आणि 'सोएक्स हर्बल हुक्का फ्लेवर' हे दोन्ही हुक्का फ्लेवरचा माल 'सोएक्स इंडीया प्रा. लि. या कंपनी कडून उत्पादीत  व निर्यात केला जात असून सदर उत्पादन केलेला हुक्का फ्लेवरचा माल या तीन गोडावूनमध्ये बेकायदेशिरपणे विक्री केला जात आहे. सदर सोएक्स इंडीया प्रा. लि. या कंपनीकडुन बनविलेला निकोटीनयुक्त 'अफजल हुक्का फ्लेवर' हा माल भिवंडी शहर परिसरासह ठाणे मुंबई यासह महाराष्ट्र राज्यामध्ये इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले व हुक्का पार्लवरही वेळोवेळी कार्यवाही केली जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी स्पष्ट केले आहे . तर देशातील तरुणाई या व्यसनाला बळी पडत आहेत हा एक ट्रेंड झाला आहे. परंतु राज्यात हुक्का पार्लरला बंदी आहे आणि त्यामुळे अनेक आजार होतात आणि ते घातक आहे त्यामुळे तरुणाईने या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असे आव्हान पोलिसांनी केले आहे.