ST workers strike : मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळ आणि सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर, कर्मचारी संघटनेच्यावतीने हायकोर्टात बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते हेदेखील उपस्थित होते. तर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. विलीनीकरणाबाबत सरकार सकारात्मक वाटत असल्याचे अॅड. सदावर्ते यांनी म्हटले. विलीनीकरणाबाबत परिवहन मंत्री अनिल परब महाधिवक्त्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती अॅड. सदावर्ते यांनी दिली. 


एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या संपाची नोटीस पहिल्यांदा देणाऱ्या संघटनेला या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हायकोर्टाने 12 नोव्हेंबर रोजी विलीनीकरणासाठी समिती नेमलेली आहे. त्या समितीला कर्मचारी संघटनांसोबत चर्चा करण्याचे आदेश दिले होते. या चर्चेनंतर आता राज्य सरकारकडून देखील कर्मचारी संघटनांना चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे. बैठकीमध्ये कर्मचारी संघटना विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


ST कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावरुन अनिल परबांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न


एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले असून ते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. परबांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या या मोर्चेकऱ्यांना सध्या आझाद मैदानावरच अडवण्यात आलं आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 


आझाद मैदानावरील आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी सुरु आहे. सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून आम्ही परबांच्या घरावर मोर्चा करणार काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Sadabhau Khot on Anil Parab : स्मशानात जा आणि भुतांशी बोला, सदाभाऊ खोत यांचा अनिल परब यांना खोचक सल्ला


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha