मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. अनिल परब म्हणतात चर्चा कुणाशी करायची, अरे मग तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले असून ते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. परबांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या या मोर्चेकऱ्यांना सध्या आझाद मैदानावरच अडवण्यात आलं आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
आझाद मैदानावरील आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी सुरु आहे. सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून आम्ही परबांच्या घरावर मोर्चा करणार काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितलं.
अनिल परब आणि कर्मचारी संघटनांसोबत बैठक सुरु असून त्यामध्ये कर्मचारी संघटना या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत.
एसटीच्या विलीनीकरणाची मागणी पूर्ण करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग सुचवला असून सरकारने निर्णय घ्यावा असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे एसटीचे विलीनीकरण सध्या तरी अशक्य असल्याचे म्हटले जात आहे.