मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी एसटीतर्फे मोफत सेवा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र कन्टेन्मेंट झोनमधून कोणालाही प्रवासाची परवानगी नसेल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. ही मोफत बस सेवा येत्या 18 मे पर्यंतच असेल. एसटीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी काही अटी आणि शर्तींसह परवानगी देण्यात येईल, असंही अनिल परब म्हणाले. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल.


कन्टेन्मेंट झोनव्यतिरिक्त कोणाला जायचं असेल त्यांना जाता येणार आहे. प्रत्येकाला परवानगी घेऊनच प्रवास करायचा आहे. त्यापूर्वी त्यांची थर्मल स्क्रीनिंग, तपासणी करुन परवानगी दिली जाईल," असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.


"लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये किंवा रस्त्यावर गर्दी करु नये. सगळ्यांची व्यवस्था केली जाईल. व्यवस्थित माहिती घेऊन, शिस्त पाळून मूळगावी परत जा," असं आवाहनही अनिल परब यांनी केलं.

ही पॉईंट टू पॉईंट सेवा आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी अन्नपाणी सोबत ठेवावं. एसटीचीच प्रसाधन गृह वापरण्यात येतील. ती स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं अनिल परब म्हणाले.

बस कुठून आणि कधी निघणार याची माहिती मोबाईलवर : अनिल परब
"जर 22 लोकांना प्रवास करायचा असेल त्यांनी नाव, पत्ता, इच्छित स्थळ, आधार कार्ड क्रमांक ही माहिती भरलेला अर्ज शहरी भागात पोलीस आयुक्तालयात द्यायचा आहे. तर ग्रामीण भागातील लोकांनी हा जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे अर्ज द्यायचा आहे. ज्या जिल्ह्यात ते जाणार आहेत, त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर, प्रवासाची एसटी बस कुठून आणि किती वाजता निघणार याची माहिती मोबाईलद्वारे दिली जाईल. ज्यांना वैयक्तिक प्रवास करायचा आहे, अशा लोकांसाठी एसटीने पोर्टल तयार केलं आहे. ते सोमवारपासून सुरु होईल. त्यावर ऑनलाईन परवानगी घ्यायची आहे. त्यानंतर त्यांना प्रवासाची माहिती दिली जाईल," असं अनिल परब यांनी सांगितलं.

प्रवासादरम्यान नियम आणि अटी
एसटीमधून प्रवास करताना प्रवाशांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. या नियमानुसार, "प्रत्येक सीटवर एक प्रवासी असेल. मास्क घालणं बंधनकारक आहे. एसटीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशाने हाताला सॅनिटायझर लावणं गरजेचं आहे. प्रत्येक बस प्रवास सुरु होण्याआधी आणि प्रवासानंतर निर्जंतुक केली जाईल. जिल्ह्यात एसटी पोहोचेल तिथला नोडल अधिकारी प्रवाशांची काळजी घेईल. गरज वाटल्यास वैद्यकीय तपासणी केली जाईल." ही सेवा 18 तारखेपर्यंत असेल, जेणेकरुन अडकलेले लोक आपापल्या मूळ गावी परत जातील," असं परब म्हणाले.

Minister Anil Parab on ST Bus Service | एसटीतर्फे बससेवा मोफत : परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती