भिवंडी : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे सामाजिक समारंभ तसंच लग्न सोहळे या कालावाधीत असल्याने अनेकांची गोची झाली. काहींनी सोशल डिस्टन्स ठेवत लग्न सोहळा पार पाडला तर काहींनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. परंतु भिवंडी शहरात लग्न समारंभासाठी आलेल्या वऱ्हाडींची तब्बल 50 दिवसांनंतर सुटका झाली आहे. लॉकडाऊनमुळे ही सगळी मंडळी अडकून पडली होती.


भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरात लॉकडाऊनपूर्वी म्हणजे 19 मार्च रोजी एक लग्न होतं. या एका लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेलंगणाच्या सिरीसिल्ला जिल्ह्यातून जवळपास 35 वऱ्हाडी भिवंडीत आले होते. लग्न सोहळा देखील थाटामाटात पार पडला. मात्र त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आणि हे वऱ्हाडी भिवंडीतच अडकले. काही दिवसांनी लॉकडाऊन उठेल या आशेने वऱ्हाडी मंडळींनी 21 दिवस घालवले. पण त्यानंतर दोन वेळा लॉकडाऊन वाढल्याने मात्र त्यांचे हाल झाले. त्यांनी घरी जाण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र कोणीही यशस्वी झालं नाही.



यानंतर या सर्व वऱ्हाडींनी मदतीसाठी खासदार कपिल पाटील यांच्याकडे धाव घेतली. खासदार कपिल पाटील आणि नगरसेवक सुमीत पाटील यांच्या प्रयत्नाने या सर्व मंडळींना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी तेलंगणा तसंच महाराष्ट्र राज्याची परवानगी घेत, एक बस भिवंडीतून तेलंगणासाठी रवाना करण्यात आली. दरम्यान 50 दिवसांपासून अडकून पडलेली ही वऱ्हाडी मंडळी अखेर बसमध्ये बसल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. घरी जातोय हा आनंतर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. टाळ्या वाजवून त्यांना निरोप देण्यात आला.