मुंबई : एकीकडे पोलीस कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई फ्रण्ट लाईनवर लढत आहे. मात्र त्याचवेळी पोलिसांनावर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत नाकाबंदीला असणाऱ्या दोन पोलिसांवर शुक्रवारी (8 मे) रात्री एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मरिन ड्राईव्हवर रात्री अकरा वाजता ही घटना घडली. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस उपनिरीक्षक शेळके जखमी झाले असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. रात्री फिरत असताना पोलिसांनी केवळ हटकलं म्हणून त्याने कोयत्याने हल्ला केल्याचं समजतं. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


काही पोलीस कर्मचारी तरुणाचा पाठलाग करुन त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तरुण काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर दोरी आणि लाठीच्या सहाय्याने आरोपीला अटक केली. त्यावेळी त्याने हातातील कोयत्याने वार केले, ज्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.



हा तरुण कुलाबा परिसरातील आहे. शुक्रवारी (8 मे) रात्री तरुण रस्त्यावर फिरत असताना नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी त्याला हटकलं. यानंतर तरुणाने बॅगमधून कोयता काढला. कोयता तुमच्या डोक्यात मारुन गंभीर इजा करेन अशी धमकी त्याने पोलिसांना दिली आणि तिथून पळ काढला. त्यानंतर पाठलाग करुन पोलीस त्याला थांबवण्याचा आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना दिसले. अखेर मरिन ड्राईव्ह चौपाटीवर दोरी, काठ्यांच्या सहाय्याने सुमारे दहा पोलिसांनी त्याला पकडलं. यावेळी त्याने कोयत्याने हल्ला केला, ज्यात दोन पोलिसांना गंभीर इजा झाली. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.



दरम्यान हा तरुण कोयता घेऊन कुठे आणि कशासाठी चालला होता. त्याला कोणाला मारायचं होतं का, याचा तपास पोलीस करत आहेत. तरुणाला मानसिक आजार नसल्याचं पोलिसानी सांगितलं. परंतु कोणत्या तरी टेंशनमध्ये तो घराबाहेर पडला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


पोलिसांवर हल्ला हा आमच्यावरील हल्ल्यासारखं : गृहराज्यमंत्री
तरुण कोयता घेऊन बाहेर का पडला? याचा तपास केला जाईल. पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही. पोलिसांवर हल्ला हा आमच्यावरील हल्ल्यासारखं आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांशी तातडीने बातचीत करणार आहे, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तसंच सध्या अडचणीची परिस्थिती आहे. तुम्ही मनोधैर्य खचू देऊ नका असं आवाहन पोलिसांना करुन तुमच्यावर हल्ला करेल त्याच्यावर तातडीने कारवाई होईल, असं आश्वासनही गृहराज्यमंत्र्यांनी दिलं.