मुंबई : अनाथ मुलांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत विशेष प्रवर्ग तयार करण्यात आला आहे. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पत्ररकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली.


समाधानकारक गुण मिळूनही एमपीएससीला मुकलेल्या अमृता नामक मुलीच्या उदाहरणावरुन मुख्यमंत्र्यानी ही घोषणा केली. खुल्या प्रवर्गातून निवड होत नसली, तरी आरक्षित प्रवर्गातून निवड होण्याइतके तिला गुण मिळाले होते. मात्र अनाथ असल्याने कुठल्या प्रवर्गातून निवड करावी, असा प्रश्न होता.

अनाथ मुलांसाठी जातीमध्ये वेगळा प्रवर्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. लवकरच नियमांसह अधिकृत घोषणा सरकार करणार आहे.

एमपीएससीसाठी अनेकजण अथक प्रयत्न करत असतात. कुटुंबाचा आधार नसलेला आणि कायमच संघर्ष पाचवीला पूजलेला अशा स्थितीत असणारे अनाथ मुलंही एमपीएससीच्या परीक्षेसाठी दिवस-रात्र एक करत असतात. त्यामुळे अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग तयार झाल्यास, त्यांच्या या संघर्षाला काहीसा आधार मिळेल, एवढं नक्की.