जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील साबरमती वसतीगृहात घुसून काही मास्कधारी गुंडांनी विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जवळपास 20 विद्यार्थांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या हल्लात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि घटनेच्या निषेधार्थ वेगवेगळ्या विद्यापीठातील विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत.
दिल्ली -
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील या घटनेच्या निषेधार्थ जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेतील हल्लेखोरांवर तत्काळ कारवाईची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
मुंबई -
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही या घटनेचा निषेध करत आंदोलन केलं. तर, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनीही एकत्र येऊन आंदोलन केलं. मध्यरात्री उशिरा आयआयटीतील सर्व विद्यार्थी एकवटले आणि त्यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या हल्ल्याचा निषेध नोंदवला.
पुणे -
पुण्यातही एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांनी रात्री उशीरा जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. या मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विरुद्ध निषेधाच्या घोषणा दिल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही घटनेचे पडसाद उमटले असून डाव्या विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत आंदोलन केलं. जेएनयूतील हल्ल्याचे पडसाद विद्यापीठातून महाविद्यालय स्तरावर पोहचले आहेत. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थी सेनेच्या वतीने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली.
औरंगाबाद -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जेएनयू हल्ल्या विरोधात निदर्शने करण्यात आली. वेगवेगळ्या आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर घोषणा दिल्या. हल्लेखोरांविरुद्ध तत्काळ कारवाईची मागणी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी केली.