नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष हिला देखील मारहाण झाल्याचे समोर आले आहे. आयषी घोषचा यासंबधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आयषी घोष म्हणाली, 'माझ्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तींनी मास्क घातले होते. माझ्या नाकातोंडातून रक्त येत आहे. सध्या मी बोलण्याच्या स्थितीत नाही', असं म्हटलं आहे. या घटनेसंदर्भात जेएनयू प्रशासनाने सांगितले की, लाठीमार करणाऱ्या अज्ञातांनी चेहऱ्याला मास्क लावून विद्यापीठाच्या आवारात फिरत होते. याचा अज्ञातांनी मालमत्तेचे नुकसान केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी सांगितले की दोन दिवसांपासून दोन्ही गटात तणाव आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाच्या विनंतीवरून पोलिस आज कॅम्पसमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली असून दिल्ली पोलिस आयुक्तांकडून या प्रकरणाची त्यांनी माहिती घेतली. सोबतच या प्रकरणाची आयजी स्तराच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

हिंसाचाराची माहिती ऐकून मला धक्का बसला - अरविंद केजरीवाल 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेबद्दल ट्वीट केलं आहे. जेएनयूमधील हिंसाचाराची माहिती ऐकून मला धक्का बसला. विद्यार्थ्यांवर क्रूरपणे हल्ला केला गेला आहे. पोलिसांना तातडीने ही हिंसा थांबावी व शांतता प्रस्थापित करावी. जर विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर देशाचा विकास कसा होईल? , असं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलं आहे.


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी  ट्वीट करतच म्हटलं आहे की, तोंडाला स्कार्फ बांधून काही लोकांनी जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर क्रूर हल्ला केला आहे. या घटनेत काहीजण गंभीर जखमी आहेत. निडर विद्यार्थ्यांना फॅस्टिस्ट शक्ती घाबरल्या आहेत. जेएनयूतील आजचा हिंसाचार याचेच प्रतिबिंब आहे.


छात्र संघाचा दावा
जेएनयू विद्यार्थी संघटनेने असा दावा केला आहे की, अभाविपचे सदस्य मास्क परिधान करुन काठ्या आणि रॉड घेऊन कॅम्पसमध्ये फिरत होते. त्यांच्या सदस्यांनी दगडफेक केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला आहे. वसतिगृहांमध्ये घुसून त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. तसेच काही शिक्षकांना देखील त्यांनी मारहाण केली. बाहेरील लोकांना या परिसरामध्ये जाण्याची परवानगी नाही आणि त्याचबरोबर मुलींच्या वसतिगृहांमध्येही जाण्याची परवानगी नसताना देखील त्यांनी घुसखोरी केली, असा आरोप जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेने केला आहे.

अभाविपचं काय आहे म्हणणं
अभाविपने दावा करताना म्हटलं आहे की, डाव्या विद्यार्थी संघटना  एसएफआय, आयसा आणि डीएसएफच्या सदस्यांनी आमच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास 25 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. हॉस्टेलमधील अनेक अभाविप सदस्यांवर हल्ले होत आहेत, वसतीगृहात तोडफोड देखील करण्यात आली आहे.