नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काल हल्लोखोरांनी मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात जवळपास 20 जण जखमी झाले असून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देशभर या घटनेचे पडसाद उमटू लागले आहे. विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकत्र येत निदर्शने केली. अनेक राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध केला आहे. मात्र घटनेनंतर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे जेएनयू प्रशासन आणि दिल्ली पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढणे गरजेचं आहे.


हल्लेखोर नेमके कोण होते?


जेएनयूमध्ये थेट घुसून विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना मारहाण करण्याची हिंमत कुणामध्ये आहे. या हल्लेखोरांचे काही फोटो समोर आहेत. हातात लाठ्या-काठ्या घेऊन हे हल्लेखोर दिसत होते. हे हल्लेखोर नेमके कोण आहेत? त्यांचा उद्देश नेमका काय होता? याची उत्तरं लवकरात लवकर जेएनयू प्रशासन आणि दिल्ली पोलिसांसमोर लवकर शोधून काढण्याचं आव्हान असणार आहे.


हल्लेखोर जेएनयू कॅम्पसमध्ये कसे घुसले?


जेएनयूच्या प्रवेशद्वारावर कडक सुरक्षाव्यवस्था असते. बाहेरील कोणत्याही व्यक्तीस आत येणे सहज शक्य नसतं. विद्यार्थ्यांनाही ओळखपत्र दाखवल्याशिवाय जेएनयू कॅम्पसमध्ये प्रवेश मिळत नाही. मात्र कालचे हल्लेखोर लाठ्या-काठ्या घेऊन मोठ्या संख्येने जेएनयूमध्ये घुसले. त्यावेळी त्यांना कुणी अटकाव केला नाही का? याचं उत्तर जेएनयू प्रशासनाला द्यावं लागणार आहे.


जेएनयूचे सुरक्षारक्षक काय करत होते?


विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एवढा राडा होत असताना, विद्यार्थ्यांना मारहाण होत असताना तेथील सुरक्षारक्षक काय करत होते. जेएनयूचं प्रशासन काय करत होतं. विद्यापीठात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी अशा तणावाच्या परिस्थितीत हल्लेखोरांना अडवण्याच्या किंवा पकडण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. मात्र तसं काही झालं नाही. त्यामुळे जेएनयूच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


पोलीस कंट्रोल रुमला कॉल आल्यानंतरही उशीरा कारवाई


जेएनयूवर हल्ला झाल्यानंतर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पोलीस कंन्ट्रोल रुमवर फोन येण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांना 90 हून अधिक फोन आले होते. पोलीस आणि जेएनयू प्रशासनाने तातडीने कारवाई केली असती तर घटना लवकर नियंत्रणात आणणे शक्य झालं असतं. मात्र पोलिसांनीही उशीरा हालचाली सुरु केल्या, असा आरोपही केला जात आहे.


काय आहे प्रकरण?


जेएनयूच्या हॉस्टेलमध्ये रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी राडा घातला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी यावेळी जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोषलाही मारहाण केली. सर्व हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क लावले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या 20 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. जेएनयू हिंसाचाराबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, "काल जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत अमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहे. आम्ही लवकरच गुन्हा दाखल करु." गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली असून दिल्ली पोलीस आयुक्तांकडून प्रकरणाची माहिती घेतली. सोबतच या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.


संबंधित बातम्या