मुंबई : मुंबईमध्ये कोरोना विषाणूने शिरकाव केला आणि मुंबईतील कामाठीपुरा येथील देहविक्रीचा व्यवसाय बंद झाला. धारावी प्रमाणेच आपल्या परिसरात सुद्धा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होणार आणि आपलं जगणं मुश्कील होणार अशी भीती या परिसरातील महिलांना वाटत होती. या परिसरातले व्यवसाय बंद झाले आणि कामाठीपुरा परिसरातील सर्वांवरच उपासमारीची वेळ आली. अशा परिस्थितीत काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत या परिसराला आधार दिला आणि बघता बघता कामाठीपुरा हा ग्रीन झोन झाला.


या परिसरातील देहविक्री करणार्‍या महिलांनी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे कामाठीपुरा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. मुंबईतील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला कसा आवर घालायचा? असा प्रश्न प्रशासनासमोर पडलेला असताना या रेडलाईट भागतील देहविक्री करणार्‍या महिलांनी मुंबईतील सुशिक्षित समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.


कामाठीपुरा म्हंटलं की नक्कीच तुमच्या भुवया ही उंचावलेल्या असतील.... कारण काही विशेष गोष्टींसाठीच कामाठीपुरा हा नेहमी चर्चेत येत असतो. पण ज्या कामाठीपुराला आत्तापर्यंत प्रत्येकानं हीन दर्जाची वागणूक दिली. या परिसराला कुचेष्टेने पाहिलं त्याच परिसराने संपूर्ण मुंबईसमोर एक आदर्श ठेवलेला आहे. तो आदर्श म्हणजे या परिसरातला झिरो टक्के कोरोना. या परिसरात सर्वसामान्य कष्टकरी वर्ग ज्या पद्धतीने राहतो त्याच बरोबर देहविक्री करून आपली उपजीविका चालवणाऱ्या महिला आणि त्यांची कुटुंबीय मोठ्या प्रमाणात कामाठीपुऱ्यात वास्तव्यास आहेत. दररोज रस्त्यावर उभारून आपला व्यवसाय करणाऱ्या या महिलांना देखील कोरोना फटका मोठ्या प्रमाणात बसला. जीवघेण्या या संकटात कोणी कामाठीपुरा कडे यायला तयार नव्हतं . त्यामुळे या महिलांची मोठी अडचण झाली. त्या मुळे कामाठीपुऱ्यात उपासमारीची वेळ आली होती . कोरोना संकट जर आपल्यावर आलं तर आपली काय हालत होईल, या केवळ विचारानेच या परिसरातल्या महिला आणि त्यांचे कुटुंबीय गारद झाली आहेत.


एका बाजूला मुंबईतील धारावीसह अनेक झोपडपट्ट्या या रेड झोन घोषित होत होत्या. त्यावेळी कामाठीपुरा सुद्धा यातून वाचणार नाही असं सर्वांना वाटत होतं. मात्र मुंबई महानगरपालिकेने योग्य नियोजन करून अनेक सामाजिक संस्थांना हाताशी धरून त्यांनी कामाठीपुराला या संकटातून व्यवस्थित बाहेर काढलं. आज अडीच महिन्याहून अधिक काळ होऊन गेला असला तरीही कामाठीपुरा मध्ये एक व्यक्ती देखील कोरोना मूळ पॉझिटिव्ह झालेला नाही.


कामाठीपुरा हा सार्वधिक दाटीवाटीचा परिसर आहे. त्यामुळे इथं कोरोनाचा संसर्ग अत्यंत जलदगतीने होण्याची भीती महापालिका प्रशासनाला होती. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात या परिसरात कोरोना रुग्ण आढळून आले होते. मात्र मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तात्काळ दक्षता घेत, हा रेड लाईट परिसर कन्टेन्मेंट आणि रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आला. महापालिकेच्या नियमांचे येथील देहविक्री करणार्‍या महिलांनी पालन केले. घरातून बाहेर न पडणे, मास्क लावणे, वारंवार हात धुणे अशी काळजी या महिला नियमित घेत होत्या. त्याचा परिणाम म्हणून आज हा 'रेड लाईट' एरिया 'ग्रीन झोन'मध्ये रुपांतरित झाला आहे.


आम्ही कामाठीपुरा या परिसराला भेट दिली. या परिसरात 6 हजाराहून अधिक महिला या देहविक्रीचा काम करत आहेत. तर त्यांच्यावर हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. एकूण या परिसराचा विचार केला तर साधारणत तेरा गल्ल्यांमध्ये दीड ते पावणेदोन लाख लोक कामाठीपुरा मध्ये वास्तव्यास आहेत. एका खोलीमध्ये पाच ते सहा जण अशा पद्धतीने दाटीवाटीने हे लोक तिथे राहतात. कोरोना जर कामाठीपुरा परिसरात दाखल झाला असता तर मात्र या परिसरात हाहाकार उडाला असता. कोरोनाविषाणू आपल्या मुंबईत आलाय यामुळे अनेक अडचणी निर्माण होणार आहेत , आपलं कसं होणार ? अशा अनेक प्रश्नांची गलबत इथल्या महिलांच्या मनात उभी होती.


या महिलांना स्वच्छतेचे, सुरक्षेचे धडे देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था या परिसरात काम करत आहेत. याच छोट्या-मोठ्या गल्ल्यांमध्ये वाढलेला आणि याच परिसरात राहणारा शंकर अण्णा आणि अंजली हे देखील या मोहिमेत सक्रिय झाले आहेत. या परिसरात कुठलीही घटना घडली की, शंकर अण्णा अॅम्ब्युलन्स घेऊन तत्पर हजर राहतो आणि रुग्णाला रुग्णालयात पोहोचवतो. शंकर अण्णा आणि अंजलीने या परिसरातील महिलांचे मनोबल वाढवला स्वतःची आणि कुटुंबाची स्वच्छता आणि सुरक्षितता कशी ठेवायची याचे धडे दिले. महापालिकेने वेळोवेळी मार्गदर्शन केलं. तर अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी कामाठीपुरा परिसरातील लोकांना दिवसातून दोन वेळा जेवण आणि इतर साहित्य पुरवलं गेलं. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून कामाठीपुरातून कोणी बाहेर गेलं , ना बाहेरून कोणी आत आलं. त्यामुळे हा संपूर्ण परिसर कोरोना मुक्त झाला.


मुंबईतील अनेक उच्चभ्रू वसाहती कोरोनाच्या विळाख्यात सापडल्या आहेत. देहविक्री करणार्‍या महिला नेहमीच समाजात उपेक्षित घटक असतात. सध्या कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांच्या मदतीसाठी संस्थेच्या माध्यमातून मदत अली. कोरोनाविषयी जनजागृती केल्याने या महिलांनी अखेर कामाठीपुरा ग्रीन झोन करून दाखवला आहे.