मुंबई : आयएलएफएस घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी कार्यालयाला रवाना झाले. मात्र यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे.

राज ठाकरे सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या कृष्णकुंज या निवासस्थानातून ईडी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली, मुलगी उर्वशी आणि बहिणही हजर आहेत. यावरुनच अंजली दमानिया यांनी ट्विटरवर राज ठाकरेंवर टीका केली. त्या म्हणाल्या की, "राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न"


जे पूर्वी व्हायला हवं होतं ते आज झालं, याचं अभिनंदन
याविषयी एबीपी माझाशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, एवढा ड्रामा कशाला? निघताना कुटुंबाला घेऊन जाणं किती योग्य आहे? ईडी कार्यालयात जाताना एकट्याने जावं, चौकशीला सामोरं जाऊन परत यावं. राज ठाकरे सरकारविरुद्ध बोलत आहेत म्हणून त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जातेय, असं म्हटलं जात असलं तरी, राज ठाकरेंकडे एवढी अमाप संपत्ती कुठून आली, प्रश्न विचारले तर चुकलं कुठे? खरंतर हे खूप वर्षांपूर्वी व्हायला हवं ते आज झालं, याचं मी अभिनंदन करते.

'भाजपच्या घोटाळेबाज नेत्यांवरही कारवाई करा'
"मात्र सरकारने केवळ त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांवरच नाही तर भाजपच्या घोटाळेबाज नेत्यांवरही कारवाई करावी," असं आवाहन अंजली दमानिया यांनी केलं. "प्रवीण दरे, मुकुल रॉय भाजपमध्ये गेले आणि त्यांच्याविरुद्धची चौकशी बंद झाली. भाजपविरुद्ध बोलणारे किंवा ते भाजपमध्ये जात नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध चौकशी करायची हे चुकीचं आहे," असंही त्या म्हणाल्या.

काय आहे प्रकरण?
काही वर्षांपूर्वी एनएमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत गेतली.

उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते.