मुंबई : कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. राज ठाकरे सकाळी 11 वाजेपर्यंत ईडी कार्यालयात पोहोचणार आहेत. मात्र कायदा-सुव्यवस्थेची स्थिती उद्भवू नये यासाठी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरु केली आहे.


मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर ठाण्याचे मनसे शहर अध्यक्ष रवी मोरे यांनाही कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दबाव तंत्र वापरुन सरकार दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.


राज ठाकरे यांना जाणिवपूर्वक ईडीकडून नोटीस देण्यात आली आहे. सरकारकडून दडपशाही, हिटरशाही सुरु आहे. याचा निषेध करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी 'EDiot Hitler' असं लिहिलेलं काळे टी-शर्ट घातले आहे. मात्र सरकारच्या दडपशाहीला आम्ही भीक घालणार नाही, असंही मनसे कार्यकर्त्यांनी म्हटलं.



राज ठाकरे यांनी स्वत: कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा आदेश मानत शांतता बाळगली आहे, मात्र तरीही पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नाराजी व्यक्त केली आहे.


काय आहे प्रकरण?


काही वर्षांपूर्वी एनएमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत गेतली.


उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते.


उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिल होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.


VIDEO | 'लाव रे तो व्हीडिओ'मुळे राज ठाकरेंना नोटीस? | माझा विशेष


संबंधित बातम्या