मुंबई : कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सकाळी 10.30 वाजता ईडीकडून चौकशी होणार आहे. दरम्यान कोहिनूरप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची पुत्र उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकरांची देखील गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरु आहे.


राज ठाकरे यांना नोटीस मिळाल्यापासून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या आहेत. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर आणि दक्षिण मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहेत.


राज ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच कुणीही ईडी कार्यालयाबाहेर जमा होऊ नये अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.


उद्धव ठाकरेंकडून पाठराखण


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंंना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. मला वाटत नाही ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होईल. त्यामुळे दोन दिवस थांबुया, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.


काय आहे प्रकरण?


काही वर्षांपूर्वी एनएमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत गेतली.


उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते.


उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिल होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.


VIDEO | 'लाव रे तो व्हीडिओ'मुळे राज ठाकरेंना नोटीस? | माझा विशेष

संबंधित बातम्या