मुंबई: मुंबईतील महत्वाच्या 16 पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. मुंबईतील पूल दुर्घटनांनंतर रेल्वे मार्गावरील सर्व पुलांचा सर्वे करण्यात आला होता. आयआयटी मुंबईच्यावतीने करण्यात आलेल्या मुंबईतील रेल्वे हद्दीतील पुलांची डागडुजी टप्प्या-टप्प्याने केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानंतर शहर भागातील एकूण 16 रेल्वे पुलांची डागडुजी करण्यात येणार आहे. यामध्ये दादरच्या टिळक पुलासह एलफिन्स्टन पूल, करीरोड, चिंचपोकळी, ग्रँटरोड आदी पुलांचा समावेश असून या पुलांवरील पृष्ठभागाची मास्टिक अस्फाल्टने डागडुजी केली जाणार आहे.


महापालिकेने यासाठी परिमंडळ एक मधील 8 पूल आणि परिमंडळ दोनमधील 8 पूल अशाप्रकारे एकूण 16 पुलांच्या कामांसाठी स्वतंत्र निविदा काढली होती. यासाठी दोन्ही स्वतंत्र निविदांमध्ये शाह आणि पारीख ही कंपनी पात्र ठरली आहे.


यासाठी अनुक्रमे 5.90 कोटी आणि 8.50 कोटी याप्रमाणे एकूण १४ कोटी ४० लाख रुपयांचे कंत्राट या कंपनीला देण्यात येत आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या मान्यतेनंतर पूलदुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.


मुंबईत पूल कोसळून झालेल्या दुर्घटना, झालेले मृत्यू, जखमा मुंबईकरांनी बरीच वर्ष पाहिल्या आहेत. गेल्या 14 मार्च रोजी सीएसएमटी स्टेशनवरील हिमालय पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाल्याची घटना घडली. सीएसएमटीच्या या पूल दुर्घटनेनंतर मात्र यासंदर्भात कारवाई आणि पूलदुरुस्तीच्या मार्गाने कामास सुरुवात झाली.



पावसाळ्यापूर्वीच मुंबईतील 20 धोकादायक पूल बंद करण्यात आले तर ऐन पावसाळ्यात मुंबईच्या वाहतुकीसाठी महत्वाचे असणारे 34 पूल पालिका आणि रेल्वे प्रशासनाचे धोकादायक ठरवले होते. यापैकीच रेल्वेला लागून असलेल्या 16 पुलांची आता डागडुजी होणार आहे.


 

महापालिकेच्या प्रस्तावानुसार या पुलांची डागडुजी होणार

डी विभाग – बेलासीस रेल्वे पूल, डायना रेल्वे पूल, फ्रेंच पूल,  ग्रँटरोड पूल, केनेडी पूल, सॅण्डहर्स्ट पूल

ई विभाग – भायखळा रेल्वे पूल

सी विभाग – प्रिन्सेस स्ट्रीट पूल

जी- दक्षिण विभाग – महालक्ष्मी रेल्वे पूल

एफ व जी -दक्षिण विभाग – प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील कॅरोल पूल(एलफिन्स्टन), चिंचपोकळी रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील पूल

करीरोड स्टेशनच्या उत्तरेकडील रेल्वे पूल

एफ-उत्तर – वडाळा रेल्वे स्टेशन जवळील नाना फडणवीस पूल, जीटीबी नगर रेल्वे पूल

जी- उत्तर विभाग – माटुंगा पश्चिम रेल्वेजवळील टी.एच.कटारिया पूल

एफ व जी उत्तर विभाग – दादरच्या मध्य व पश्चिम रेल्वेवरील टिळक पूल

संबंधित बातम्या 

मुंबईकरांची कोंडी, पावसाळ्याआधी मुंबईतील 20 धोकादायक पूल बंद होणार


मुंबईची पूलकोंडी, धोकादायक 34 पुलांपैकी 26 पूल वाहतुकीसाठी बंद