असा आहे हा मतदारसंघ
हा मतदारसंघ केवळ ठाणे महानगरपालिकेपुरता सीमित नाही. तर मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये देखील त्याचा काही भाग येतो. ठाण्यातील लोकमान्यनगर, वर्तकनगर शास्त्रीनगर, शिवाजीनगर अशा बैठ्या चाळीच्या मध्यम आणि गरीब वर्गाच्या विभागापासून ते थेट वाघबीळ, कासारवडवली, माजिवडा, गायमुखपर्यंतचा भाग याच मतदारसंघांमध्ये येतो. तर दुसरीकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विभागातल्या चेन्ना गाव, घोडबंदर गाव, वर्सोवा, काशिमिरा, गोल्डन नेक्स्ट, नवघर हे विभाग देखील ओवळा माजिवडा याच मतदारसंघात येतात.
इतिहास काय सांगतो
2009 च्या आधी ठाणे आणि बेलापूर हे विधानसभा मतदारसंघ अतिशय मोठे होते. या दोघांचे 2009 ला विभाजन करण्यात आले. पुनर्रचना झाल्यानंतर ठाणे शहर मतदारसंघातील काही भाग आणि बेलापूर मतदारसंघातील मोठा भाग जोडून ओवळा माजिवडा मतदारसंघ बनवण्यात आला. तेव्हापासून म्हणजेच 2009 पासून प्रताप सरनाईक यांना शिवसेनेकडून ओवळा माजिवडा या मतदारसंघासाठी तिकीट दिले जातेय.
हे ही वाचा - कोपरी पाचपाखाडी विधानसभा | शिवसेनेचा बालेकिल्ला सर करण्याचे कॉंग्रेसपुढे मोठे आव्हान
सद्यस्थिती काय आहे
2009 पासून प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचा गड राखलेला आहे. 2014 ला ज्यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळ्या तिकिटांवर निवडणूक लढवत होते. त्यावेळी देखील प्रताप सरनाईक विजयी झाले. 2014 ला भाजपच्या संजय पांडे यांनी प्रताप सरनाईक यांना चुरशीची लढत दिली होती. मात्र प्रताप सरनाईक अखेर दहा हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आले. यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. अजून तरी शिवसेना आणि भाजप यांची युती आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी देखील झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांनाच तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.
आघाडीत सर्व आलबेल
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सध्या ठाण्यामध्ये फार काही चांगलं चालत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाचे एकनिष्ठ जितेंद्र आव्हाड अजूनही ठाण्यात चांगली खिंड लढवत आहेत. त्यामुळे पक्षाचे आस्तित्व टिकून आहे. मात्र काँग्रेसचा एकही मोठा नेता ठाण्यात नाहीये. त्यामुळे सर्व जबाबदारी ठाण्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांच्यावरच आहे. प्रताप सरनाईक यांना टक्कर देण्यासाठी रिंगणामध्ये मनोज शिंदे हे स्वतः उतरू शकतात किंवा काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांना रिंगणात उतरवू शकतात. विक्रांत चव्हाण हे ठाण्यातले जानेमाने काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यांचे ओवळा माजिवडा या विधानसभा क्षेत्रात काम देखील सुरु आहे पण सुरज परमार यांच्या आत्महत्येच्या केसमध्ये त्यांचे नाव आले होते. म्हणून त्यांच्या नावाला वादाची किनार देखील आहे. मात्र असे असूनही याआधी देखील काँग्रेसने त्यांना नगरसेवक पदाचे टिकीट दिली असल्याने विधानसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार काँग्रेस करेल अशी शक्यता आहे.
हे ही वाचा -वरळी विधानसभा मतदारसंघ | आदित्य ठाकरे, सचिन अहिर, सुनील शिंदे; उमेदवारी कोणाला?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत जर मनसे आणि वंचित आघाडी आली तर मात्र कदाचित या मतदारसंघाचे चित्र वेगळे होण्याची शक्यता आहे. जर वंचित काँग्रेसने राष्ट्रवादी सोबत आली तर या मतदारसंघावर आपला हक्क सांगू शकते. कारण लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर असे अनेक अल्पसंख्यांक आणि बहुजन लोकांचे विभाग या मतदार संघात आहेत. असे असले तरी देखील काँग्रेस हा मतदारसंघ सोडेल याची शक्यता फारच कमी आहे.
या मतदारसंघात असलेल्या समस्या
ओवळा माजिवडा या विधानसभा मतदारसंघाचा एकूण विचार करायचा झालाच तर इथे उच्चभ्रू वस्ती ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. टोलेजंग इमारती असलेल्या मोठमोठ्या सोसायटी इथे उभ्या राहत आहेत. सोबतच जो भाग अजूनही बैठ्या चाळींचा, झोपडपट्टीचा आहे. त्या भागात देखील केसारीच्या माध्यमातून मोठे गृहनिर्माण प्रकल्प येणाऱ्या काळात होणार आहेत. लोकवस्ती वाढत असतानाच याच मतदारसंघात येणाऱ्या घोडबंदर रोड, भिवंडी बायपास, मुंबई नाशिक हायवे या रस्त्यांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आहे. येणाऱ्या काळात या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून इथे मेट्रो 4 चे निर्माण देखील सुरू आहे. ते झाल्यानंतर इथे असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल असं सरकारचं म्हणणं आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकवस्ती आणि गाड्यांचे प्रमाण यामुळे हा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल अशी शक्यता थोडी कमीच आहे. वाहतूक कोंडी सोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील इथे महत्त्वाचा आहे. अजूनही मोठ्या सोसायटीस मध्ये पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या दोन प्रश्नांवर इथे यावर्षी देखील मतदान केले जाईल.
हे ही वाचा - वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ | मातोश्रीच्या अंगणातला गड वाचवण्यासाठी शिवसेनेला जोर लावावा लागणार
2019 च्या निवडणुकीत शक्यता
देशातली एकूण परिस्थिती पाहता आणि ठाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये मिळालेली शिवसेनेची आघाडी पाहता इथल्या मतदारांचा कल शिवसेनेकडे असल्याचे लक्षात येते. तरीही तरुण मतदारांची जास्त संख्या, नोटाचा वाढलेला वापर यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये आणि मिळालेल्या मताधिक्क्यामध्ये थोडा फरक इथे होऊ शकतो. एकूणच बघायचं झालं तर शिवसेनेकडून म्हणजेच युतीकडून प्रताप सरनाईक यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात आहे तर आघाडीकडून अजूनही नावाची चाचपणी सुरू आहे. जर युती अशीच टिकली तर प्रताप सरनाईक यांचे पारडे जड मानले जात आहे.
एकूण मतदार - 438832
पुरुष 246860
स्त्रिया 191322
तरुण मतदार 19345
एकूण मतदान केंद्रे 432
2014 चा निकाल
प्रताप सरनाईक ( शिवसेना ) 68571
संजय पांडे ( भाजपा ) 57665
हणमंत जगदाळे ( राष्ट्रवादी ) 20686
विजयी - प्रताप सरनाईक - 10906 चे मताधिक्य
- जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
- धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसपुढे बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं आव्हान
- जळगाव शहर मतदारसंघ | युतीचं वाढतं वर्चस्व, तर सुरेश जैन यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई
- मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
- साक्री विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार?
- बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण
- जालना विधानसभा मतदारसंघ | जालन्यात वंचितची काँग्रेसला धास्ती
- परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
- येवला-लासलगाव मतदारसंघ | छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार?
- अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
- परभणी विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या खेळीने शिवसेना अडचणीत
- मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान