Nitin Gadkari : आता महामार्गाच्या निर्मितीमध्ये तुम्हीही थेट गुंतवणूक करु शकता. मुंबईमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याची घोषणा केली. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी मुंबई शेअर बाजारात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे InvIT नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर (Non-convertible debenture) सूचीबद्ध करण्यात आले. गडकरी यांनी घंटा वाजवून या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव आणि प्राधिकरणाच्या अध्यक्ष अलका उपाध्याय यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, 'मुंबई शेअर बाजारात InvIT नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर सूचीबद्ध होणे ही ऐतिहासिक घटना आहे. कारण यामुळे पायाभूत सुविधा संबंधी निधी पुरवठ्यामध्ये लोकसहभागाचा प्रवेश वाढेल. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 25% एनसीडी राखीव ठेवल्या आहेत असे सांगत, InvIT च्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाल्यापासून अवघ्या 7 तासांत जवळपास सातपट अतिरिक्त मागणी नोंदवण्यात आली.' ही गुंतवणूक सर्वाधिक विश्वासार्ह असून वार्षिक 8.05 % इतके उत्पन्न देते. या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांना (सेवानिवृत्त नागरिक, पगारदार व्यक्ती, छोटे आणि मध्यम व्यावसायिक) राष्ट्र उभारणीच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी आपण देऊ शकलो, याचा आपल्याला मनापासून आनंद वाटत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. 10,000 रुपये इतक्या किमान गुंतवणुकीपासून सुरूवात करणे शक्य असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पायाभूत सुविधा विशेषतः रस्ते बांधण्यासाठी मोठी गुंतवणूक महत्त्वाची ठरते. रस्त्यांमुळे देशाचा सामाजिक-आर्थिक विकास शक्य होतो. येत्या काळात किरकोळ गुंतवणुकदार या प्रकल्पांमध्ये मोठ्या संख्येने गुंतवणूक करतील आणि पुढे, हळूहळू संस्थात्मक गुंतवणुकदारांना मागे टाकतील. 26 नव्या द्रुतगती मार्गांसह अन्य काही प्रकल्प नियोजित आहेत ज्यांमुळे गुंतवणुकीच्या आणखी संधी उपलब्ध होणार आहेत, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था साकारण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील गुंतवणूक कायम ठेवण्याचे आवाहन यावेळी गडकरी यांनी गुंतवणुकदारांना केले. पायाभूत सुविधा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या वर्धनक्षम असतात आणि त्यातून चांगला परतावा मिळतो, असे ते म्हणाले.
Non-convertible debenture म्हणजे काय?
नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर (एनसीडी) एक फायनाशियल इंस्ट्रूमेंट आहे. याचा वापर सार्वजनिक समस्यासाठी पैसे उभरण्यासाठी केला जातो. एनसीडी कंपन्यासाठी आयपीओप्रमाणे पैसे उभारते, पण यामध्ये फरक आहे. एखादी कंपनी एनसीडीमार्फत पैसे उभारल्यास त्याला कर्जाप्रमाणे घेतले जातात. गुंतवणूकदारांना निश्चित व्याजदरासोबत आपले पैसे परत मिळतात.