वसई : वसईच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आदिवासी महिलांना विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आतापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे आदिवासी लोकांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान महिलांना मारहाण केली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावरुन तपास सुरु असून चौकशीनंतरच कारवाई केली जाईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.


माहितीनुसार, या सर्व महिला मूळच्या पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात राहणाऱ्या आहेत. पोटाची भूक भागवण्यासाठी या सर्व महिला वसईच्या पापडी तलाव कोळीवाडा या ठिकाणी राहण्यास आल्या आहेत. या महिला वसईत बिगारी काम करतात रोज प्रमाणे या महिला शुक्रवारी वसई पश्चिमेच्या पापडी येथील बाजारात बाजारहाट करत असताना काही नागरिकांनी या चोरी करण्यासाठी आल्याचे सांगत पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलिसांनी त्यांना रिक्षात बसवून पापडी चौकीत नेले. येथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना दांडुक्याने मारहाण करत चोरीचा आरोप लावला असल्याचे आदिवासी महिला सांगत आहेत. 


महिलांनी या संदर्भात आदिवासी संघटनांना या घटनेची संपूर्ण माहिती दिल्यावर त्यांनी या प्रकरणी पोलिसांना जाब विचारला असता पोलिसांनी केवळ समज देण्यासाठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना कोणतीही मारहाण केली नसल्याचा दावा केला जात आहे. तर वसई विरार महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय तपासणीत महिलांच्या दंडावर मारहाण झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात माहिती देताना वसई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवर सुरू असून पुढील कारवाई केली जाईल असे सांगत आहेत. तर या महिलांना न्याय मिळावा यासाठी श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेत दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी केली आहे.   


आदिवासी भगिनींना न्याय मिळाला पाहिजे-नीलम गोऱ्हे 


या प्रकरणावर बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती अॅड. नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, या घटनेत तथ्य आहेत. घटना 100 टक्के खरी आहे. या आदिवासी भगिनींना न्याय मिळाला पाहिजे सोबतच दोषींना शिक्षा व्हायला हवी. यासाठी मी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक निवेदन देणार आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.