Mumbai Local Trains : रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य सरकारने युटीएस मोबाईल अ‍ॅप आणि युनिव्हर्सल पास लिंक केले आहेत. त्यानंतर आता लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागणार नाही. रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारच्या गाईडलाईन्स अंतर्गत कोणतीही व्यक्ती जिनं कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांना युनिवर्सल पास घेणं गरजेचं आहे, जे लसीच्या स्थितीची योग्य पडताळणी केल्यानंतर जारी करण्यात येतं. 


मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी यासंदर्भात बोलताना दिलेल्या माहितीनुसार, "यूटीएस मोबाईल अ‍ॅप (UTS Mobail App) आणि युनिव्हर्सल पास (Universal Pass) लिंकिंगमुळे प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय त्यांचे तिकीट विनाव्यत्यय मिळू शकेल.  प्रवास करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनं लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील आणि शेवटच्या डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी झाला असेल, अशा प्रवाशांना राज्य सरकारच्या पोर्टलद्वारे लसीकरण स्थितीची योग्य पडताळणी केल्यानंतर जारी करण्यात आलेला राज्य सरकारचा युनिव्हर्सल पास घ्यावा लागेल.  तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काउंटरवर युनिव्हर्सल पास दाखवावा लागतो. आता युनिव्हर्सल पास जारी करणारे राज्य सरकारचे पोर्टल रेल्वेच्या यूटीएस मोबाइल ॲपशी जोडले गेले आहे.  ज्यामध्ये वर नमूद केलेल्या श्रेणीतील प्रवासी काउंटरवर न जाता तिकीट खरेदी करू शकतात."


या ॲपद्वारे प्रवासी तिकीट आणि मासिक तिकीट दोन्ही जारी केले जाऊ शकतात. मासिक तिकिटांचे नूतनीकरण देखील शक्य आहे.  तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना काउंटरवर जाण्याची गरज नाही. ही सुविधा प्रवाशांसाठी दिनांक २४ नोव्हेंबरपासून अँड्रॉइड गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध होईल. ज्या प्रवाशांनी यापूर्वीच युटीएस मोबाइल अ‍ॅप डाउनलोड केले आहे. त्यांना ही नवीन युटिलिटी सक्रिय करण्यासाठी अ‍ॅप अपडेट करावे लागेल. 


प्रवाशांच्या लसीकरण स्थितीची पडताळणी करणारी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे महामारीच्या काळात युटीएस मोबाइल अ‍ॅप निलंबित करण्यात आले होते. आता युटीएस ॲप लोकांसाठी उघडले जाईल. योग्य लसीकरण पडताळणी द्वारे राज्य सरकारचे पोर्टल आणि रेल्वे युटीएस मोबाइल अ‍ॅप लिंक करणं शक्य झालं आहे. हे नवीन ॲप्लिकेशन एक स्वतंत्र उदाहरण आहे. जिथे रेल्वे सर्व्हर तिकिटांच्या प्रमाणीकरणासाठी बाह्य सर्व्हरशी हातमिळवणी करत आहेत.  युनिव्हर्सल पास पोर्टल आणि यूटीएस मोबाईल ॲपला जोडणे हा महाराष्ट्र राज्य सरकार, रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (CRIS) आणि मध्य रेल्वेचा संयुक्त प्रयत्न आहे.