मुंबई: महाराष्ट्राच्या अधिवेशनात आज शिवस्मारकाच्या उंचीच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरु झाला. सरकार शिवस्मारकाची उंची कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला.


कंत्राटदार बदलला म्हणून त्याच्या सोयीप्रमाणे स्मारक व्हायला नको, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मांडली. यावर उत्तर देताना सरकारनं शिवस्मारकाची उंची कमी केलेली नाही असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला. तसंच शिवस्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल, असं मुनगंटीवार म्हणाले.

जयंत पाटील यांचा आरोप

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. जास्त खर्च नको म्हणून सरकार पुतळ्याची उंची कमी करु पाहत आहे का? शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आलेलं हे सरकार आता महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करत आहे. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चलो आले मोदी के साथ अशी घोषणा देत या सरकारने शिवप्रेमींची फसवणूक केली.

 पृथ्वीराज चव्हाण-

शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली होती. मात्र या स्मारकाच्या आराखड्यात बदल केल्याने पुन्हा परवानगी घ्यावी लागणार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण यांचा कालचा आरोप

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप मंगळवारी केला.  राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची घोषणा केली आणि त्यात शिवाजी महाराजांचा जगातील सगळ्यात मोठा भव्य पुतळा उभा करणार असल्याची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात सरकारने पुतळ्या ऐवजी चौथऱ्याची उंची वाढवली आहे. त्यामुळे सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप, पृथ्वीराच चव्हाण यांनी केला.

स्मारकाची उंची 192 मीटरवरुन 210 मीटर करण्यात आली. मात्र उंची वाढवण्याच्या नावाखाली सरकारने प्रत्यक्षात पुतळ्याची उंची कमी करुन पुतळ्याखाली चौथऱ्याची उंची वाढवली असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.

अजित पवार :

या सरकारचं चाललंय काय? यांनी शिवाजींचं नाव घेऊन निवडणुकीत घोषणा केली. आता हे बुचकळ्यात पडले आहेत.

 सुधीर मुनगंटीवार यांचं उत्तर

शिवस्मारक हा तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाचा विषय आहे.  210 मीटरचा हा पुतळा तयार करण्याचा निर्णय झाला तो त्याच उंचीचा राहील यात शंका नाही.

2001 मध्ये हा निर्णय होऊनही कार्यादेश देण्यास 2018 साल उजाडलं. मागच्या सरकारच्या वतीने मी जनतेची माफी मागतो. तुम्ही हा राजकारणाचा विषय केला तर तुमच्याकडे चार बोटं जातात. हा राजकारणाचा विषय होत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार यांचं विरोधकांना आव्हान :

हिम्मत असेल तर चर्चा करा. गेल्या 15 वर्षात तुमच्या सरकारने छत्रपतींसाठी काय केले आणि आम्ही केलेले 15 निर्णय यावर चर्चा करा.

मुनगंटीवारांच्या या निर्णयानंतरही विरोधकांची घोषणाबाजी सुरु राहिली, त्यामुळे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आक्रमक झाले.

विनोद तावडे आक्रमक

- आम्ही स्मारक करतोय म्हणून यांच्या पोटात दुखतंय. यांनी महाराजांच्या स्मारकासाठी काही केलं नाही. जाऊन उंची मोजून या. उद्या या विषयावर चर्चा लावा, आज कामकाज चालवा, असं तावडे म्हणाले.

यानंतर विरोधक आणि तावडे आमने सामने आले. विरोधकांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. त्यानंतर सत्ताधारीही वेलमध्ये उतरले.