मुंबई: अयोध्या प्रश्नावरुन अध्यात्मिक गुरु श्री.श्री.रवीशंकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना चांगलीच संतापली आहे. आज सेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून श्री.श्री.यांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.


श्री.श्री. हे अध्यात्मिक गुरु आहेत, त्यांनी राजकारणात लुडबूड करु नये. अयोध्या आणि राम मंदिराचा प्रश्न त्यांनी सुप्रीम कोर्ट, नरेंद्र मोदी सरकार आणि सरसंघचालक मोहन भागवतांवर सोडावा असं सामनामध्ये म्हटलं आहे.

राम मंदिराचा प्रश्न सामोपचारानं मिटवला नाही, तर देशात रक्ताच्या नद्या वाहतील असं वादग्रस्त विधान श्री.श्री. यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.

‘सामना’ अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

आपल्या देशातील ‘लोकशाही’चे नाव बदलून ‘लुडबुडशाही’ करावे. कारण जो उठतो तो कोणत्याही विषयात लुडबुड करुन किंवा घुसखोरी करून आपल्या अकलेचे चांदतारे पाजळत असतो. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’वाले एक आध्यात्मिक म्हणवून घेणारे गुरू श्री श्री रविशंकर हे गेल्या दोनेक वर्षांपासून राममंदिरप्रश्नी लुडबुड करू लागले आहेत व यानिमित्ताने प्रकाशझोतात राहण्याची धडपड करीत आहेत. या गुरू महाराजांनी आता असा आध्यात्मिक संदेश दिला आहे की, ‘अयोध्येत मंदिर प्रश्न सुटला नाही तर हिंदुस्थानची अवस्था सीरियासारखी होईल.’ आता गुरू महाराजांनी ही धमकी दिली आहे, भविष्यवाणी वर्तवून खळबळ उडवली आहे की सीरियातील धर्मांध ‘इसिस’ टोळय़ांना मंदिर प्रश्नात ओढून एकप्रकारे नव्या अराजकाची सुपारी दिली आहे? याचा तपास आता राष्ट्रीय सुरक्षेसाठी करणे गरजेचे आहे. आध्यात्मिक गुरूच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. माणसे मारणे व तशा धमक्या देणे हे कसले आर्ट ऑफ लिव्हिंग?