मुंबई : शिवसेनेने शिव वाहतूक सेना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचे अध्यक्ष हाजी अराफात शेख भाजपमध्ये गेल्यानंतर ही कठोर पावलं उचलण्यात आली.
हाजी अराफात शेख यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिव वाहतूक सेनेचं अध्यक्षपद रिक्त होतं. त्यानंतर संपूर्ण शिव वाहतूक सेना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच नव्या समितीची घोषणा केली जाणार आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत वाद झाल्यानंतर शेख शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हाजी अराफात शेख यांनी नाट्यमयरित्या भाजपमध्ये प्रवेश केला.
हाजी अराफात शेख यांच्या भाजपप्रवेशानंतर शिवसेनेने वाहतूक सेनेविरोधात कठोर पावलं उचलली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कडक इशारा दिला होता.
हाजी अराफात शेख हे पूर्वी मनसेत होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अखेर शिवसेनेलाही जय महाराष्ट्र करत त्यांनी भाजपची वाट धरली.