मुंबई : काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. प्रिया दत्त यांनी स्वत: पत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली. प्रिया दत्त उत्तर-मध्य मुंबईमधून दोनदा खासदार राहिल्या आहेत.


प्रिया दत्त यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवलेल्या पत्रात 2019 ची लोकसभा निवडणूक न लढवण्याबाबतची माहिती दिली आहे. तर पक्षांतर्गत गटबाजीमुळे दत्त निवडणूक लढवणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


"मी आगामी निवडणूक लढवणार नाही. गेली काही वर्ष अतिशय चांगली होती. मात्र राजकीय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना माझी तारेवरची कसरत होत आहे. माझ्याकडे देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या मी व्यवस्थितपणे हाताळल्या असं वाटतं. मात्र राजकारण सोडून आयुष्यात बरंच काही आहे. त्याकडे आता मला लक्ष द्यायचं आहे", असं प्रिया दत्त यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.


प्रिया दत्त उत्तर-मध्य मुंबईमधून दोनदा खासदार राहिल्या आहेत. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपच्या पूनम महाजन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. प्रिया दत्त यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता याठिकाणी काँग्रेसकडून कोण निवडणूक लढवणार याबाबच चर्चा सुरु झाली आहे. चांदिवलीतून पाच वेळा आमदार राहिलेले नसीम खान यांचं नाव आता चर्चेत आहे.