मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज 'मातोश्री' बाहेरुन जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. मोहित कंबोज हे 'मातोश्री' बाहेर उभे राहून रेकी करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. या हल्ल्यानंतर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. 


साधारणपणे रात्री साड नऊ वाजता मोहित कंबोज हे कलानगर परिसरातून जात होते. मोहित कंबोज यांची गाडी दिसल्यानंतर शिवसैनिकांनी त्यावर हल्ला केला. शिवसैनिकांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. 


मोहित कंबोज म्हणाले की, "भाजप नेते आणि आपण एका लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या ठिकाणाहून परतत असताना कमलानगरच्या जंक्शनच्या ठिकाणी माझ्या गाडीवर हल्ला केला. मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसून विरोधी पक्षनेत्यांवर हल्ले केले जात आहेत."


शिवसेना नेते वरुण सरदेसाई या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "मोहित कंबोज चार-पाच गाड्यांसह त्या ठिकाणी आले होते. त्यांनी या परिसराची रेकी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना उत्तर दिलं आहे. शिवसैनिकांना डिवचू नका." 


मुंबईत मातोश्रीच्या बाहेर शनिवारी सकाळी नऊ वाजता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यामुळे या परिसरात शिवसैनिकांनी एकच गर्दी केली आहे. 


भाजपच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी भाजप नेत्यांचे एक शिष्टमंडळ उद्या मुंबई पोलीस आयुक्तांना भेटणार असल्याची माहिती आहे. तसेच या प्रकरणाची आपण पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची माहितीही मोहित कंबोज यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: