मुंबई: एक हा आरआरआर (RRR) आहे, ज्याने राजमौलींना आणखी मोठा दिग्दर्शक बनवलं, ज्याने एनटीआर ज्युनिअर आणि रामचरणला सुपरस्टार केलं आणि महिन्यात 1100 कोटींचा गल्ला जमवला. हे झाले सिनेमातील आरआरआर. तर दुसरीकडे राजकारणातही आरआरआर आहेत, ज्यांनी शिवसेनेला टार्गेट केलंय. हे आरआरआर म्हणजे राणे, रनौत आणि राणा.
राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला महाकौल दिला. पण मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं वेगळा मार्ग पत्करला आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करत महाविकास आघाडी स्थापन केली. तेव्हापासून शिवसेनेविरोधात अनेक जण आक्रमक झालेत. त्याचपैकी तीन व्यक्ती म्हणजे कंगना रनौत, नारायण राणे आणि राणा दाम्पत्य.
पहिला आर- कंगना रनौत
अभिनेता सुशांत सिंहनं आत्महत्या केली आणि त्यावरून राजकारण सुरु झालं. याच प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतनं आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यावेळी तिने मुंबई असुरक्षित असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावरही जोरदार टीका केली. लगेचच शिवसेनेने अरे ला का रे असं म्हणत कंगनाच्या घरावर बुलडोझर चालवला आणि तोच संघर्ष आजही सुरुच आहे.
दुसरा आर- नारायण राणे
नारायण राणे आणि शिवसेना हा संघर्ष महाराष्ट्रासाठी नवा नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून हा संघर्ष आणखी पेटला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द काढले.
बस...मग पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक झाली. नारायण राणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आणि त्यांना अटक झाली. नंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. पण हाच संघर्ष आता आणखी टोकाला गेला.
तिसरा आर- नवनीत राणा आणि रवी राणा
उद्धव ठाकरेंच्या राशीला लागलेल्या आरआरआरमधील तिसरा आर आहे अमरावतीचे राणा दाम्पत्य. भाजपशी जवळीक साधल्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी शिवसेनेविरोधात जणू युद्धच सुरु केलंय. त्यातच राणांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असं जाहीर केलं आणि शिवसैनिक संतापले. खरं तर राणा आणि शिवसेना हा वाद 2014 पासूनच आहे. आता तो आणखी पुढे गेलाय.
तसं पाहिलं तर आणखी एक आर आहे ज्याच्या निशाण्यावर शिवसेना आहे... त्यांचं नाव आहे राज ठाकरे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज ठाकरेंनी शिवसेनाला कायम टार्गेट केलंय. आताही त्यांनी मशिदीवरील भोंगे हटवा अशी मागणी केली. भोंगे हटवले नाहीत तर हनुमान चालिसा पठण करणार असं जाहीर केलं आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले.
एकूणच काय तर बॉक्स ऑफिसवरच नाही तर राज्याच्या राजकारणातही आरआरआरचा बोलबाला आहे. आता हे आरआरआर राजकारणाच्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरतात..? की शिवसेना हा सिनेमा राजकारणाच्या थिएटरवरुन उतरवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या: