Navneet Rana vs Shivsena : कितीही विरोध झाला तरी उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले. आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याने अमरावती पोलिसांना गुंगारा देत मुंबई गाठली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेत मातोश्रीवर निर्धार व्यक्त केला. यावेळी रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली. 


आमदार रवी राणा यांनी म्हटले की, मातोश्रीवर हनुमान चालिसा मुख्यमंत्र्यांनी वाचावी. राज्यावर आलेले संकट, साडेसाती हनुमान चालिसा वाचल्यानंतर दूर होईल. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही हनुमान चालीसा पठणावर ठाम आहोत. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचं स्वागत केलं असते. तर, एक वेळा नाही 100 वेळा वाचायला सांगितलं असते. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही असेही रवी राणा यांनी म्हटले. आमचे कार्यकर्ते जे येणार होते, त्यांना मी सांगतो कोणी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, असेही त्यांनी म्हटले. 


बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे जर शिवसैनिक असते तर त्यांनी आमच्यासोबत हनुमान चालीसा पठण केल असते. बजरंगबलीचे नाव घेऊन मी येथे आलो आहे. शिवसैनिकांनी धमकी दिली होती,  मुंबई पाय ठेऊन दाखवा.  त्यांना सांगू इच्छितो की अरे मी मुंबईत आलो आहे. हनुमान चालिसा वाचल्याने मी इथपर्यंत आलो असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.


संजय राऊत म्हणजे पोपट; नवनीत राणा यांचा हल्लाबोल


संजय राऊत हे पोपट आहेत. दररोज सकाळी पत्रकारांना जमवून बडबड करत असतात. गोव्यात शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली होती. आता महाराष्ट्रातदेखील गोव्यासारखी स्थिती होणार असल्याचे नवनीत राणाने म्हटले. शिवसैनिक आमचं काहीही वाकडं करू शकत नाही. त्यांनी मुंबईत पाय ठेवू देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आम्ही मुंबईत आलो आहोत.