मुंबई : शेतकऱ्यांसाठी मुंबईतील पीक विमा कार्यालयावर इशारा मोर्चा काढणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. येत्या बुधवारी म्हणजे 17 जुलै रोजी वांद्र्यातील पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येईल. शिवसेना भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सर्व पीक विमा कंपन्यांना इशारा दिला. याचवेळी त्यांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला उपस्थित राहणार नसल्याचंही स्पष्ट केलं.

हा मोर्चा शेतकरी मोर्चा नसेल, तर शेतकऱ्यांसाठी मोर्चा असेल. शिवसेनेचा हा इशारा मोर्चा आहे. जर इशारा देऊनही झालं नाही तर आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्राकडे स्वतंत्र कृषी स्थापन करण्याची मागणी केल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

शेतकरी कर्जमाफी हा विषय जुना आहे, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. 'पंतप्रधान पीक विमा योजना' चांगली असली, तरी ही योजना, यंत्रणा तळगाळात पोहचत नाही. सरकार जरी बदललं असलं, तरी यंत्रणा तीच आहे. आजही काही प्रकरणं बाकी आहेत, लोकांना मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हा इशारा मोर्चा निघणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

मी पंढरपूरला जाणार नव्हतो, मी माझा कार्यक्रम मी स्वत: जाहीर करेन, असं म्हणत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना उद्धव ठाकरेंनी पूर्णविराम दिला. आषाढी एकादशीला पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत उद्धव ठाकरेही विठ्ठल-रुख्मिणीची महापूजा करणार असल्याचं बोललं जात होतं.