मुरबाड (कल्याण) : एकीकडे सारे शिकूया, पुढे जाऊया म्हणत सरकार शिक्षणाबद्दल जनजागृती करत असलं, तरी यासाठी पुरेशा सुविधा पुरवण्यात मात्र हेच सरकार अपयशी ठरत असल्याचं दिसतंय. कारण ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यात शाळेत जाण्यासाठी छातीभर पाणी अन् डोक्यावर दप्तर असा विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे.
कल्याण आणि मुरबाड तालुक्याच्या वेशीवर बांगरवाडी गाव आहे. आदिवासीबहुल असलेल्या या गावाची लोकसंख्या जवळपास 200 च्या घरात आहे. मात्र याच गावाला जाणाऱ्या एकमेव रस्त्याची ही अवस्था दयनीय आहे. कुंदे गावापासून बांगरवाडी गावाला जायला एक कच्चा रस्ता आहे. दुसऱ्या गावात किंवा शहरात, तालुक्याला जायचं असेल, तर याच रस्त्यावरुन गावातले आबालवृद्ध, विद्यार्थी, महिला यांना रोजचा प्रवास करावा लागतो. जवळपास अडीच किलोमीटरच्या या रस्त्यात वाटेत एक ओढा लागतो, मात्र हा ओढा पार करताना पाणी कंबरेच्याही वर जातं. लहानग्या विद्यार्थ्यांच्या तर डोक्यावरुन पाणी जातं. मात्र तरीही ना विद्यार्थी शाळेत जाणं सोडत, ना मायबाप सरकार यांच्याकडे लक्ष देतं. वर्षानुवर्षे गावात हाच जीवघेणा प्रवास सुरु आहे.
हा भाग मुरबाड विधानसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात येत असल्याचं इथले ग्रामस्थ सांगतात. भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्याकडे अनेकदा इथले टेम्पोभर लोक रस्त्याच्या समस्येसाठी गेले आहेत. मात्र दरवेळी एकच समस्या घेऊन का येता? असं आमदारांचं उत्तर असल्याचा दावा ग्रामस्थ करतात. शिवाय हे नेते गावात फक्त निवडणुकीपुरतेच दिसतात, असाही आरोप ग्रामस्थांचा आहे. तर हा रस्ता खासगी जागेतून जात असल्याने कामात अडचणी येत असल्याचा गावच्या ग्रामसेवकाचा दावा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या रस्त्याची ही समस्या जैसे थे आहे. एकीकडे समृद्धी महामार्गासाठी वाट्टेल ते करुन खासगी जमिनी घेण्यात आल्या. मात्र दुसरीकडे याच महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेले बांगरवाडीत मात्र तुमच्याकडून गावातल्या रस्त्याचाही प्रश्न सुटत नसेल, तर ती समृद्धी काय कामाची? याचा विचार गांभीर्याने करणं गरजेचं आहे.