(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Kanal: पक्षासाठी काहीच करत नाहीत त्यांना मानाचं स्थान दिलं जातंय; राहुल कनाल यांची ठाकरे परिवारावर टीका
Shivsena Rahul Kanal On Aditya Thackeray: मला ठाकरेंनी थांबवलं की नाही मला माहित नाही, पण पक्ष सोडून जायला मात्र मजबूर केलं असल्याचा आरोप राहुल कनाल यांनी केला आहे.
मुंबई: एकीकडे ठाकरे गट मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल आज शिंदेंच्या शिवसेनेच प्रवेश करणार आहेत. कोरोना काळात राहुल कनाल चांगला होता मग आता तो वाईट का झाला असा सवाल त्यांनी विचारला आहे. ज्यांनी पक्षासाठी काही केलं नाही त्यांना पक्षात स्थान दिलं जातंय अशी टीका राहुल कनाल यांनी केली.
राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरे आणि युवासनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मी जे करतोय ते योग्यच आहे, मला जे लोकांनी सांगितलं तेच मीच करतोय. पक्ष वाढवत असताना तुमची नियत चांगली असते. आम्ही गल्ली गल्लीत पक्ष वाढवला. तुम्हाला जर काही अडचण असेल तर माझ्यावर कारवाई करा पण इतरांवर कारवाई का करता? राहुल कनाल कोरोना काळात तुमच्यासाठी चांगला होता. मग आता तो वाईट का झाला? सोशल मीडियावर कोण काय करतंय हे मला माहित आहे. पण लक्षात ठेवा सोशल मीडिया मला पण येतं. काही वेळा लीडरची मजबुरी असते कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ते. त्यांनी माझ्यापेक्षा कोणालातरी सरस निवडलं. बॅास इज अलवेज राईट.
ज्यांना पक्षाचं काही पडलं नाही त्यांना पक्षात स्थान दिलं जातंय अशी टीका राहुल कनाल यांनी केली. ते म्हणाले की, वरूण सरदेसाई एवढा मोठा नाहीय की युवा सेनाच्या विरोधात जाईल. मी गेल्या 20 वर्षापासून राजकारणात आहे आणि वरूण सरदेसाईचं वय फक्त 26 आहे. या देशात कसाबचं ऐकलं गेलं, पण तिकडे आमचं ऐकलं जात नाही. कोणाला सन्मान दिला जावा हे समजलं गेलं पाहिजे.
मला ठाकरेंनी थांबवलं की नाही मला माहित नाही, पण पक्ष सोडून जायला मात्र मजबूर केलं असल्याचा आरोप राहुल कनाल यांनी केला आहे.
इतरांना समजून घेण्याची ठाकरेंची इच्छा नाही, राहुल कनाल यांचा हल्ला
राहुल कनाल यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलीये. उद्धव ठाकरे पक्षातील तीन ते चार जणांच्या इशाऱ्यावर चालतायत, पक्षात लोकांना जोडून ठेवण्याची किंवा त्यांना सामावून घेण्याची इच्छाच ठाकरेंमध्ये नाहीये असं कनाल म्हणाले.
वांद्रे पश्चिम विभागातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर युवासेनेनं कनाल यांच्या वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती दिली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयानं अधिकृतरित्या ही बातमी दिली आहे. युवासेनेच्या याच इन्स्टा पोस्टचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत राहुल कनाल यांनी नाराजी व्यक्त करणारं ट्वीट केलं आहे. तसेच या ट्वीटमध्ये राहुल कनाल यांनी पक्षाची साथ सोडल्याचं एकप्रकारे जाहीरच केलं आहे.