मुंबई : कोस्टल रोडच्या कामासाठी मुंबईतील 83 वर्ष जुन्या वरळी सीफेसवर हातोडा पडणार असून, त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होणार आहे. मॉर्निंग वॉकला येणाऱ्या हायप्रोफाईल रहिवाशांची समजूत काढण्यासाठी शिवसेना पहाटेपासून कामाला लागली आहे. शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक आणि कोस्टल रोडचे अधिकारी साडेसहा वाजल्यापासून जॉगिंगला येणार आहेत.

सी-फेसच्या प्रॉमनेडवर बॅरिकेटिंग केल्याने मॉर्निंग वॉक, जॉगिंग, व्यायाम करायला येणाऱ्या रहिवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे 'वरळी सी-फेसच्या जॉगर्स अँड वॉकर्स असोसिएशन' आणि 'लाफ्टर क्लब'च्या सदस्यांनी कोस्टल रोडच्या कामाला विरोध केला आहे. या असोसिएशनच्या सदस्यांमध्ये बडे उद्योजक, व्यापारी, आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबईतील कोस्टल रोड हा शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळेच या हाय प्रोफाइल रहिवाशांची समजूत काढण्यासाठी पहाटे-पहाटे शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक आणि कोस्टल रोडचे अधिकारी जॉगिंगला आले आहेत.

यापूर्वी वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवांनीही कोस्टल रोडला विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून प्रकल्पाचं काम सुरु करण्यात आलं. परंतु उच्चभ्रू स्थानिक रहिवाशांची नाराजी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि शिवसेना खडबडून जागे झाले आहेत. इतकंच नव्हे तर पहाटे रस्त्यावर उतरुन जॉगिंग करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

सध्या दोन किमी लांबीचा असलेला सीफेस नव्या स्वरुपात चार किमीचा होणार आहे. विशेष म्हणजे कोस्टल रोड आणि वरळी सी फेसला जोडणारा रस्ता हा हरित पट्टा असेल. या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी बोगद्यांचीही योजना असेल. सध्या वरळी सी फेसच्या बाजूलाच कोस्टल रोडसाठी समुद्रात भरावाचं काम सुरु आहे.

उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन, भाजपचा बहिष्कार

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 16 डिसेंबर 2018 रोजी कोस्टल रोडचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. ब्रीच कॅन्डी येथील अमरसन्स गार्डन येथे कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे भाजपच्या इतर नेत्यांनीही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याचे उद्धव ठाकरे याना आमंत्रण दिले नसल्याने शिवसेनेने कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामधून भाजपला डावलत त्याची परतफेड केली होती.

'कोस्टल रोड हे माझे स्वप्न नसून प्रत्येक मुंबईकरांचे स्वप्न आहे. याचे संपूर्ण श्रेय मुंबईकरांना जाते. या प्रकल्पासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे आभार. तसेच या प्रकल्पामुळे कोळी बांधवांचे नुकसान होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतली आहे' असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

असा असेल 'कोस्टल रोड' प्रकल्प!

- प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत 9.98 किलोमीटर कोस्टल रोड असणार आहे.

- पुढील 4 वर्षांत हा कोस्टल रोड पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. प्रकल्पाचं बांधकाम तीन भागांत विभागण्यात आलं असून काम स्वतंत्रपणे एकाच वेळी केलं जाणार आहे.

- महापालिकेमार्फत होणाऱ्या कामाचे कंत्राट लार्सन अँड टुब्रो, एचसीसी आणि एचडीसी या कंपनींना मिळणार आहे.

- आठ हजार कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या या प्रकल्पाचा खर्च विविध करांमुळे तब्बल 12 हजार कोटींवर पोहचला आहे.

- या प्रकल्पाचा पहिला भाग प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस, दुसरा भाग हा बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी बाजूपर्यंत,तर तिसरा भाग प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क असा असणार आहे.

- प्रकल्प सल्लागारांनी बनवलेल्या आराखड्यानुसार प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान (पॅकेज 4), प्रियदर्शनी उद्यान ते बडोदा पॅलेस (पॅकेज 1), बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक (पॅकेज 2) अशा तीन भागांमध्ये विभागून या कोस्टल रोडचं काम हाती घेण्यात येत आहे. पॅकेज 4 आणि पॅकेज 1 साठी लार्सन अँड टुब्रोला (एल अँड टी) कंपनी पात्र ठरली आहे. तर पॅकेज 2 साठी एचसीसी आणि एचडीसी ही कंपनी पात्र ठरली आहे.

संबधित बातम्या 

उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोस्टल रोडचे भूमिपूजन, भाजपचा बहिष्कार

कोस्टल रोड प्रकल्पावर मनसेची नेमकी भूमिका काय? | मुंबई | एबीपी माझा


कोस्टल रोड प्रकल्पावर राज ठाकरेंनी घेतली कोळी बांधवांची भेट | मुंबई | एबीपी माझा


कोस्टल रोड प्रकल्पावरुन शिवसेना-मनसे आमनेसामने | मुंबई | एबीपी माझा


असा असेल मुंबईतील ‘कोस्टल रोड’ प्रकल्प