मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षणाच्या स्थितीचा आढावा घेणाऱ्या असर 2018 अहवालाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडेही उपस्थित होते. या अहवालानुसार गेल्या 4 वर्षात देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रानं शिक्षणाच्या विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


या अहवालात खासगी शाळांपेक्षा राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम असल्याचं म्हंटल आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील 'प्रथम' या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो.

शैक्षणिक प्रगतीमुळे आम्ही समाधानी नसलो, तरीही असरच्या अहवालातील शैक्षणिक प्रगती उत्साह वाढविणारी आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या प्रगतीचा आलेख याच दिशेने अधिक उंचविण्याकडे आम्ही सकारात्मक प्रयत्न करत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
दहावी नापासांकडून शाळांचं मूल्यमापन, 'असर' अहवालाचं धक्कादायक वास्तव

असरचं हे तेरावं राष्ट्रीय तर महाराष्ट्राचं चौदावं सर्वेक्षण आहे. असर 2018 सर्वेक्षण महाराष्ट्रातील 33 ग्रामीण जिल्ह्यात 990 गावातील 19,765 घरांमध्ये करण्यात आले. महाराष्ट्रात 14 सामाजिक संस्था, 21 विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या मार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्रातील या सर्वेक्षणात 3 ते 16 वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला. खाजगी शाळांतून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांचे प्रमाण 2006 मध्ये 18.3 टक्के होते. ते प्रमाण 2018 च्या सर्वेक्षणानुसार 37.6 टक्क्यांवर पोहोचले आहे.

'असर'च्या सर्वेक्षण अहवालातील वैशिष्ट्ये

  • पटनोंदणीची टक्केवारी 98.5 वरुन 99.2 टक्के इतकी झाली आहे.

  • प्राथमिक शाळेतील मुलांची प्रगती उच्च प्राथमिक शाळांतील मुलांपेक्षा चांगली आहे.

  • खाजगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम आहे.

  • भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची खूप चांगली प्रगती दिसून येते.

  • गणितामध्ये इयत्त तिसरी, पाचवी आणि आठवीमध्ये प्रगती चांगली दिसून येते.

  • जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मुलांची व शिक्षकांची अधिक उपस्थिती आहे.

  • शाळांमध्ये पुरविल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणत वाढ झालेली आहे.

  • अधिकारी, शिक्षक यांच्या सांघिक प्रयत्नांचे यश म्हणून या प्रगतीकडे पाहणे आवश्यक आहे.