अरबी समुद्रातील शिवस्मारक हा देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचं जलपूजन केलं होतं. त्यानुसार स्मारकाच्या कामाला सुरुवातही करण्यात येणार होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचं काम सुरु करु नका, असा तोंडी निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला.
पर्यावरणवाद्यांच्या याचिकांचा राज्य सरकारला मोठा फटका बसला आहे. या आदेशामुळे शिवस्मारक प्रकल्पाचं काम आणखी रखडण्याची शक्यता आहे. काम थांबवण्याच्या आदेशानंतर कंत्राटदाराला द्याव्या लागणाऱ्या निधीवर सार्वजनिक बांधकाम विभाग फेरविचार करणार आहे. 144 कोटी निधीचा पहिला टप्पा देण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे.
शिवस्मारक रखडणार, काम सुरु न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
दरम्यान, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी या अनुषंगाने आज (16 जानेवारी) सकाळी 11 वाजता शिवस्मारक प्रकल्प कार्यालयात तातडीची बैठक बोलावली आहे.

कसं असेल शिवस्मारक?
16 एकर जमीन
शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडली आहे. हे स्मारक सुमारे 309 फूट उंच असेल. समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दाखविण्यासाठी दालन, वस्तुसंग्रहालय आणि उद्यान असा आराखडा आहे.
स्मारकाची जागा राजभवनपासून दक्षिण-पश्चिम बाजूस 1.2 कि.मी अंतरावर, गिरगाव चौपाटीवरील एच.टु. ओ जेट्टीपासून दक्षिण-पश्चिम दिशेने 3.60 कि.मी अंतरावर आणि नरिमन पाँईटपासून पश्चिमेस 2.60 कि.मी अंतरावर आहे.
स्मारकासाठी 15.96 हेक्टर आकारमानाचा खडक निवडण्यात आला आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे 650 मी 325 मी. एवढे आहे. सभोवताली 17.67 हेक्टर जागा उथळ खडकाची आहे.
स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील 2500 कोटी रुपयांपैकी 1200 कोटी रुपये हे शिवाजी महाराजांच्या ब्रॉन्झच्या पुतळ्यासाठी असतील. मात्र प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्लॅन अजून निश्चित झालेला नाही. या टप्प्यात हेलिपॅड आणि आयमॅक्स थिएटर यांसारख्या सुविधा असाव्यात, असा प्रस्ताव आहे.
शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत.
संबंधित बातम्या
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मार्ग मोकळा
शिवस्मारकासाठी पैसा कुठून आणणार? : हायकोर्ट
शिवस्मारक जगात सर्वात उंच, 210 मीटरपर्यंत उंची वाढवण्याचा प्रस्ताव