Shivsena: शिवसेनेच्या दोन्ही पक्षांचं शक्तिप्रदर्शन; बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरेंचा अंधेरीत, शिंदेंचा बीकेसीत मेळावा, कोणते मुद्दे मांडणार याकडे लक्ष

Shivsena Melava: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यांचे आज मुंबईत मेळावे होणार आहेत. ठाकरे गटाचा मेळावा अंधेरीतील छत्रपती श्रीशिवाजी महाराज क्रीडा संकुलात, तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलात होणार आहे.

Continues below advertisement

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज (23 जानेवारी रोजी गुरुवारी) असून, या जयंती दिनाचे औचित्य साधत शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही पक्षांनी मेळाव्यांचे आयोजन केले आहे. उद्धव ठाकरे (Shivsena UBT) आणि एकनाथ शिंदे (Shivsena) गट यांचे आज मुंबईत मेळावे होणार आहेत. ठाकरे गटाचा मेळावा अंधेरीतील छत्रपती श्रीशिवाजी महाराज क्रीडा संकुलात, तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलात होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मेळाव्याच्या निमित्ताने हे दोन्ही गट मुंबईत पुन्हा शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग दोन्ही पक्षांकडून आज यानिमित्ताने फुंकण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे नव्या वर्षात होणाऱ्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, कोणते मुद्दे मांडणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Continues below advertisement

ठाकरेंच्या शिवसेनेचा महामेळावा कसा असणार?

आज सायंकाळी सहा वाजता ठाकरेंच्या मेळाव्याला सुरुवात होईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवास पुन्हा उलघडणार आहे. शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट, छायाचित्रे आणि चित्रफितींच्या माध्यमातून सर्वांसमोर हा जीवन प्रवास सादर केला जाणार आहे. या महामेळाव्याच्या  सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांची भाषण होतील. शिवसेनाप्रमुखांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्या विजेत्यांच्या महामेळाव्यात गौरव करण्यात येईल. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण होईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे राज्यभरातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधित करतील. 

गेल्या वर्षी 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभेत महाविकास आघाडीतील पक्षांना चांगलंच यश मिळालं मात्र, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांना जबर धक्का बसला. यामध्ये उद्धव ठाकरे गटाला देखील मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेतील निराशेनंतर ठाकरे गटात प्रचंड नाराजी आहे. अनेक माजी आमदार आणि निवडणुकीतील पराभूत उमेदवार ठाकरे गटाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. अशातच पक्षाने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा न केल्याने पक्षातील काही आमदारांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय विधानसभेतील  पराभवानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्याचबरोबर आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिका स्वबळावर लढण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे, त्या अनुषंगाने ठाकरे कोणत्या मुद्यांवर भाष्य करणार ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola