मुंबई: शिवसेनेच्या आजच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या स्टेजवर खासदार संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची आरक्षित ठेवण्यात आली आहे. ईडीने कारवाई केलेल्या आणि सध्या तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्यामागे संपूर्ण पक्ष ठाम असल्याचा संदेश यामागे देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. 


शिवसेनेच्या गटप्रमुखांचा आज मेळावा होत असून यामध्ये उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर हा पहिलाच मेळावा असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दसरा मेळावा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कोणावर तोफ डागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली असून ते सध्या तुरुंगात आहेत. पण आजच्या मेळाव्याच्या स्टेजवर त्यांच्यासाठी एक खुर्ची राखीव ठेवण्यात आली आहे. शिवसेना संजय राऊत यांच्या पाठिशी ठाम असल्याचा संदेश यामागे देण्यात आला आहे. संजय राऊत हे आमचे नेते आहेत, त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी आम्ही ही खुर्ची रिकामी ठेवली आहे असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 


शिवसेनेच्या गटप्रमुखांसाठी आयोजित मेळाव्यासाठी आज नेस्को मैदानात भव्य तयारी करण्यात आली आहे. यासाठी मोठया प्रमाणत फ्लेक्स बाजी देखील करण्यात आली आहे. यावेळी एक फ्लेक्सची प्रचंड चर्चा सभास्थळी पाहिला मिळाली. शिवसेनेने या आधी देखील टॅग लाईनच्या माध्यमातून विरोधकांना जेरीस आणल्याच पाहिला मिळालं आहे. नुकतेच 40 बंडखोर आमदारांना पन्नास खोके एकदम ओक्के, गद्दारांना माफी नाही अशा आशयाच्या घोषणा आणि फ्लेक्स पाहिला मिळाले होते. यामध्ये प्रामुख्याने टॅगलाईनवर मोठ्या प्रमाणात पक्षाचं लक्ष असल्याचं दिसत आहे. 'बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा', असा शिवसेनेचा नवा नारा असणार आहे.


पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत.शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणातील (Patra Chawl Land Scam Case) आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर संजय राऊतच्या जामीन अर्जावर (Sanjay Raut Bail) सुनावणी होणार आहे.