Ajit Pawar in Mantralay : फिफाच्या (Fifa) लोगो अनावरण सोहळ्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची कॅबिनेट बैठक लांबल्याने दोघेही कार्यक्रमाला वेळेत पोहचू शकले नाहीत. ज्यामुळे अजित पवारांना जवळपास अडीच तास वाट पाहत थांबावे लागले. दरम्यान तीन तास होऊनही कार्यक्रम सुरु न झाल्याने अजित पवार मंत्रालयातून निघून गेले. पवार निघून गेल्यानंतर संबधित कार्यक्रम सुरु झाल्याचंही दिसून आलं.

  


नेमकं काय घडलं?


आज (21 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता फिफा स्पर्धेसाठीचा लोगो अनावरण सोहळा पार पडणार होता. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विरोध पक्षनेते अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार होते. कार्यक्रम दुपारी 12 वाजता सुरु होणार अशी माहिती मिळाल्याने अजित पवार 12 च्या सुमारास मंत्रालयात पोहोचले. दुसरीकडे कॅबिनेट बैठक सुरु असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी येऊ शकले नाहीत. त्यामुळे अजित पवार यांनी माहित संपर्क सचिवांकडे वाट पाहिली. जवळपास तीन तास उलटल्यानंतरही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री न आल्याने अखेर पवारांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी त्यांनी कार्यक्रमाशी संबधित काही अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडे आपली नाराजी देखील व्यक्त केली.



'जनतेच्या हिताचे निर्णय कॅबिनेटमध्ये घेत असल्याने उशीर झाला'


दरम्यान या सर्वांवर राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ''एखाद्या कार्यक्रमाला उशीर होत असतो, जनतेच्या हितासाठी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेत असताना उशीर होतो. कार्यक्रम हे वेळेतच झाले पाहिजेत पण मविआच्या काळात चर्चा होत नसल्याने ते वेळेत पोहोचत होते.'' अशी प्रतिक्रिया देत अजित पवारांना टोलाही लगावला. 


वेळेचं नियोजन करायला हवं - अजित पवार


हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी मला कोणताही राग आलेला नाही, राग यायचं काही कारण नाही, पण मुख्यमंत्र्यांनी वेळेचं योग्यप्रकारे नियोजन करायला हवं.'' अशी प्रतिक्रिया दिली आहे.   


हे देखील वाचा