Sanjay Raut : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना पाठवण्यात आलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले. आज काँग्रेसकडून होणारे आंदोलन हा केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून होत असलेल्या दुरुपयोगाविरोधातील संताप असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. 


भाजपच्या विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास देण्याचे षडयंत्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस देण्यात आली असल्याचे राऊत यांनी म्हटले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांचा सुरू असलेला हा छळ हा देशाच्या स्वातंत्र्याला आणि लोकशाहीला खड्ड्यात घालण्याचे काम करत असल्याचेही राऊत यांनी सांगितले.


आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी


शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा 15 जून रोजी अयोध्या दौरा असून त्याची तयारी सुरू असल्याची माहिती राऊत यांनी दिली. या तयारीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत अयोध्या येथे दाखल होणार आहेत. अयोध्येत रामल्लाचे दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे हे शरयू नदीची आरती करणार आहेत. नदी काठावर आरतीची जय्यत तयारी सुरू आहे. आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी नाशिकच्या शिवसैनिकांवर देण्यात आली असून शिवसेना पदाधिकारी अयोध्येत तळ ठोकून आहेत. शरयू नदीच्या तीरावर कमानी स्टेज उभारणीचे काम सुरू आहे. त्याशिवाय, हजारो शिवसैनिक स्पेशल ट्रेनने अयोध्येला रवाना होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. आदित्य यांचा अयोध्या दौरा म्हणजे राजकीय शक्तिप्रदर्शन नसून हा आमच्या श्रद्धेचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


ईडी चौकशीसाठी आज राहुल गांधी हजर राहणार


नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. या दरम्यान काँग्रेसकडून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत. दिल्ली, मुंबई, नागपूरमधील ईडी कार्यालयाबाहेर ही निदर्शने होणार आहेत. दिल्लीतील ईडी कार्यालयाच्या दिशेने जाणारे मार्ग दिल्ली पोलिसांनी सील केले आहेत. या ठिकाणी जमलेल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.