PM Modi Visit To Dehu : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या म्हणजेच 14 जून रोजी पुण्यातील देहूमध्ये  (Dehu) येणार आहेत. यामुळे केंद्रीय सुरक्षा पथकाच्या सूचनेनंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना हाय अलर्ट देण्यात आल्यामुळे रात्री शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईत दाखल होणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. संशयित व्यक्ती, गाड्या यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. कुठे कुठे आणि मध्यरात्री का प्रवास केला जात आहे याची माहिती घेतली जात आहे.


पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर कोणताही घातपात घडू नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी आणि खबरदारी घेतली जात आहे. हाय अलर्ट जारी केल्या मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी, रिक्षासह ट्रक, टेम्पो या वाहनांची तपासणी केली जात आहे. ते कुठून कुठे जात आहेत, कशासाठी मुंबईत दाखल झाले आहेत, याची माहिती घेतली आहे. संपूर्ण दोन दिवस हा हाय अलर्ट मुंबईत असणार आहे. त्यामुळे रात्री शहराच्या विविध ठिकाणी मुंबई पोलीस गस्त घालत आहेत, नाकाबंदी करुन तपासणी करत आहेत.


संत तुकारामांच्या मूर्ती आणि शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते
संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) यांच्या मूर्तीचं अन् शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासाठी देहू संस्थानने मार्च महिन्यात मोदींना दिल्लीत जाऊन आमंत्रण दिलं होतं. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं असून मोदींनी येत्या 14 जूनची वेळ दिली आहे, अशी माहिती देहू संस्थानने दिली होता. इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू इथे येणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत त्या शिळा मंदिराची पायाभारणी प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती असताना केली होती. तेव्हापासून सुरु असलेल्या कामाला कोरोना काळात चांगली गती मिळाली. संपूर्ण दगडात तेही कोरीव काम करुन हे मंदिर उभारलेलं आहे जे आता पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पणासाठी प्रतीक्षेत आहे. हिच प्रतीक्षा आता 14 जून रोजी संपणार आहे. 


संत तुकारामांचं मंदिर एक दिवस बंद राहणार
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहूतील जगतगुरु संत तुकाराम महाराजांचं मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आधी संस्थानानं घेतला होता. त्यानुसार, 12 जूनपासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार होतं. परंतु समाज माध्यमांवर उमेटलेल्या प्रतिक्रियांमुळे या निर्णयात बदल करण्यात आला आहे. आता संत तुकाराम महाराजांचं मंदिर एकच दिवस म्हणजे 14 जून रोजी दर्शनासाठी बंद राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रोटोकॉल पाहता, केंद्रीय तपास यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांना कार्यक्रमस्थळाचा ताबा घ्यावा लागतो. त्यामुळे ते या ठिकाणी पोहोचल्यावर भाविकांना दर्शनापासून वंचित राहावं लागू शकतं.



 


महत्त्वाच्या इतर बातम्या