मुंबई: शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना इशारा देताना चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. कोणी अरे केलं तर तुम्ही का रे करा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, दुसऱ्या दिवशी मी टेबल जामीन करुन देतो असं ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.


मुंबईतील मागाठाणे या ठिकाणच्या कोकणी पाडा बुद्धविहार येथे सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना आमदार प्रकाश सुर्वे यांनी हे चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, "कोणी तुम्हाला अरे केलं तर तुम्ही का रे करा. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. ठोकून काढा, प्रकाश सुर्वे इथं बसलाय. हात नाही तोडता आला तर तंगडी  तोडा. दुसऱ्या दिवशी मी टेबल जामीन करून देतो, चिंता करु नका. आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही, पण अंगावर आल्यास शिंगावर घेऊन त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही."


आमदार प्रकाश सुर्वे यांचा या संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. 


शिवसेनेची प्रतिक्रिया
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यावर बोलताना म्हणाल्या की, "एक लोकप्रतिनिधी आणि जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घ्या असं बेजबाबदार वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी हे सर्व सुरू असून त्यामुळे तरुणांची माथी भडकवली जात आहेत. यांच्यात एवढं धाडस कुठून आलं? यांच्यामुळे आता गुंडगिरीमध्ये महाराष्ट्र हा यूपी आणि बिहारच्या पुढे जात आहे."


 


महत्त्वाच्या बातम्या: