Aaditya Thackeray : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देशाच्या 100 व्या स्वातंत्र्य दिनी दिल्लीत ध्वजारोहण करतील असा विश्वास शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले. 


किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की,  आज शिवसेना भवनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याआधी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 50 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना भवनात ध्वजारोहण करण्यात आले होते. आता पुढे देशाचा 100 वा स्वातंत्र्य दिन असेल तेव्हा आदित्य ठाकरे हे दिल्लीतून येऊन झेंडावंदन करतील, असा विश्वास किशोरी पेडणेकरण यांनी व्यक्त केला. 


देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव करत असताना देशात अडचणीदेखील तेवढ्याच असल्याचेही त्यांनी सांगितले. किशोरी पेडणेकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. महिलांना सक्षम करण्यासाठी संसदेत आणि विधीमंडळात महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी त्यांनी केली. घराणेशाहीबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, घराणेशाहीबाबत फक्त ठाकरेंवर निशाणा का साधताय असा प्रश्न त्यांनी केला. भाजपमध्येही नेत्यांच्या मुलीला, मुलाला संधी मिळत असल्याकडे पेडणेकर यांनी लक्ष वेधले. 


केवळ 'हर घर तिरंगा मोहीम' न राबवता देशातील घरोघरी वाढलेली महागाई कमी कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे असा टोला शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी लगावला. यावेळी अहिर यांनी मंत्रिमंडळ खाते वाटपावरून बंडखोरांना टोला लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात काहींकडे महत्त्वाची, मोठी खाती होती. दादा भुसे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी आम्ही सोपवली होती. पण, हे खाते वाटप पाहता त्यांना काय मिळालं हा प्रश्न सगळ्यांना पडला असल्याचे अहिर यांनी म्हटले. भाजपच्या विचारांच्या अजेंड्यावर हे सरकार काम करत असून चांगली खाती भाजपच्या आमदारांना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 


स्वातंत्र्य दिनानिमित्त आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवनवर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.


घराणेशाहीवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात (PM Modi Speech) घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीमुळे गुणवत्तेवर अन्याय केला असल्याचे म्हटले. राजकीय क्षेत्रातील घराणेशाहीचे प्रतिबिंब इतर क्षेत्रातही उमटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. घराणेशाहीचा तिरस्कार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, गुणवत्तेवर अन्याय होत असल्याने घराणेशाहीचा तिरस्कार करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, मी ज्यावेळी काका-पुतण्याशाही, घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना मी फक्त राजकीय क्षेत्राबद्दल बोलतोय असं वाटतं. दुर्देवाने राजकारणातील या घराणेशाहीची लागण देशातील इतर संस्थांमध्ये झाली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. राजकारणाच्या बाहेरील घराणेशाहीमुळे देशातील गुणवत्तेचे नुकसान झाले आहे.