Shiv Sena Anil Parab:  शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांना अखेर वाकोला पोलीस ठाण्यात (Vakola Police Station) दाखल गुन्ह्यात अटकेपासून दिलासा मिळाला आहे. परब आणि अन्य सहा जणांनी याप्रकरणी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज स्वीकारत मुंबई सत्र न्यायालयातीस विशेष कोर्टानं प्रत्येकी 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हा जामीन देतान सर्व आरोपींना तपासांत मुंबई पोलिसांना (Munbai Police) सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह स्नेहा साटम, दीपक गुटकर, दिनेश कुबल, संदीप शिवलकर, चंद्रशेखर वाईंगणकर आणि हरी शास्त्री यांनाही कोर्टानं दिलासा दिला आहे. तसेच याप्रकरणी अटकेत असलेल्या सदानंद परब, संतोष कदम, उदय दळवी, माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनाही मुंबई सत्र न्यायालयानं मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. या चौघांना 27 जून रोजी याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर यावर मंगळवारी संध्याकाळी सुनावणी पार पडली.


काय आहे प्रकरण


काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय पालिकेनं अनधिकृत म्हणून पाडलं होतं. त्याच्या निषेधार्थ परब आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ एच-पूर्व प्रभागाच्या अधिकारी स्वप्ना क्षीरसागर यांना भेटण्यासाठी बीएमसीच्या कार्यालयात पोहोचलं. पक्ष कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असतानाही आमचं पक्ष कार्यालय उद्ध्वस्त करणारे अधिकारी कोण होते?, असं परब आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी अधिका-यांना विचारलं. तेव्हा काही कर्मचारी पुढे आले असता कार्यकर्त्यांनी बीएमसीचे सहाय्यक अभियंता अजय पाटील (42) यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना धमकी दिली, असा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये उल्लेख आहे. 


त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाकोला पोलिसांकडे याची रितसर तक्रार दाखल केली. त्याआधारे परब यांच्यासह संतोष कदम, सदा परब, उदय दळवी आणि हाजी अलीम खान यांच्यासह अन्य सहाजणांविरूद्ध पालिका अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परब यांच्यासह अन्य सहा आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तर अटकेत असलेल्या चार आरोपींनी जामीन अर्ज केला होता.