Uniform Civil Code : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक पार पडली. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. समान नागरी कायद्याला पाठिंबा असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत.  शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर ठाकरे गटाच्या सर्व आमदार खासदार उपनेत्यांची बैठक बोलावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर या बैठकीत ठाकरे गटांच्या नेत्यांकडून राज्यातील विविध मतदार संघांमध्ये याचा नेमका काय परिणाम होणार? या संदर्भात आढावा घेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली


समान नागरी कायद्यासंदर्भात (Uniform Civil Code) ठाकरेंच्या या बैठकीत चर्चा झाली. या कायद्याला आमचा पाठिंबा असून जोपर्यंत मसुदा या कायद्यासंदर्भात समोर येत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे किंवा भूमिका योग्य नसल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. 


उद्धव ठाकरे हे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता पक्ष संघटनेची ताकद वाढवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. सर्व नेत्यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना सुद्धा या बैठकीत देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर महाविकास आघाडीमध्ये राहायचे की नाही? यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी या बैठकीत आमदार खासदार आणि इतर नेत्यांची मते जाणून घेऊन आपण यापुढे महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याचा निर्णय ठाकरे गटाकडून या बैठकीत घेण्यात आला. 


उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची विदर्भातून सुरुवात - 


शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यभरातील दौऱ्याची सुरवात विदर्भातून होणार आहे. येत्या आणि आणि नऊ जुलैला विदर्भापासून नेते संपर्क प्रमुख व आमदार दौरा करणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिनांक ८ जूलै रोजी अमरावती दौरा आणि ९ जुलै रोजी यवतमाळ दोरा होणार आहे. विदर्भ दौऱ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सभा घेऊन शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. तर देशातील विरोधकांची बैठक पार पडल्यानंतर पुन्हा 20 जुलैपासून पुढे उर्वरित महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा वेळापत्रक ठरेल.  आदित्य ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे हे नेते सुद्धा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाऊन दौरे करणार आहेत. 


आम्ही महाविकास आघाडीसोबतच - भास्कर जाधव


राज्यात ज्या राजकारणात घडामोडी झाल्या त्यानंतर सर्व पक्ष बैठका बोलवत आहेत. यामध्ये आमच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा बैठक बोलावली होती. राष्ट्रवादीमध्ये ज्या घडामोडी घडल्यात त्याचा मतदारसंघांमध्ये नेमका काय इम्पॅक्ट होईल याबद्दल आढावा घेण्यात आला, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत. उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत, याची तारीख पक्षाचे सचिव ठरवतील मात्र हा दौरा 100% होणार आहे. आम्ही सुद्धा या दौऱ्यामध्ये सर्व ठिकाणी जाणार संघटना मजबूत करण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, असे भास्कर जाधव यांनी सांगितले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उपस्थित सर्व शिवसेना नेते आणि लोकप्रतिधिंना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर महाविकास आघाडीत रहायचे की नाही…? यावर सर्वांची मतं घेतली…. यावेळी उपस्थित सर्व शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधींनी हात वर करून महाविकास आघाडीतच रहायचे असा निर्णय दिला, अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली. 


ऑन राज ठाकरे उद्धव ठाकरे


मनसे पक्ष किंवा राज ठाकरे संदर्भात कुठल्याही प्रकारे चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. या आपल्याच माध्यमातून चर्चासमोर येत आहेत, मात्र आजच्या बैठकीत राज ठाकरे आणि मनसे पक्ष संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही, अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली. 


समान नागरी कायदा


बाळासाहेब ठाकरे यांनी समान नागरी कायद्याला समर्थन दिलं होतं, पाठिंबा दिला होता. आमचा सुद्धा पाठिंबा याला असेल, मात्र जोपर्यंत या संदर्भातील मसुदासमोर येत नाही तोपर्यंत आमचा पक्ष भूमिका समोर ठेवणार नाही. समान नागरी कायदा हा मुद्दा आगामी निवडणुका विचारात घेता आणला आहे, आणि भाजप हा मुद्दा समोर आणून निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यामुळे जोपर्यंत मसुदा येत नाही तोपर्यंत या संदर्भात कुठली भाष्य करणं अथवा मग भूमिका मांडणे योग्य नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.