मुंबई : मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. या मुंबई महापालिकाचे बजेट सादर आज सादर होणार आहे. कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यात 'अर्थसंकल्प देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको', अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केलीय. असं असतानाच उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पातून पूर्ण होणार का? मुंबईकरांसाठी काय नव्या घोषणा केल्या जातील? याकडं लक्ष लागले आहे.


कोविड संकटामुळे मुंबईकरांचं कंबरडं मोडलंय आणि महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांवर कोणतीही नवी करवाढ लादली जाणार नाही अशी शक्यता आहे. गेलं आर्थिक वर्ष कोविडमध्ये गेल्याने अपेक्षित उत्पन्नाच्या केवळ 25 ते 30 टक्के महसूल आतापर्यंत जमा झाला आहे. कोरोनामुळेच जाहिरातदार, हॉटेल, बिल्डरांना प्रिमियमध्ये सूट देण्यात आली आहे. याच धर्तीवर मुंबईकरांवर यावर्षी करवाढ टळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक सक्षमीकरणासाठी पालिका कोणत्या उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


यंदा महापालिकेच्या तिजोरीत आवक कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. 500 स्क्वे फुटांपर्यंतच्या घरांचा केवळ सर्वसाधारण कर माफ झाला आहे. त्या घरांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ केला जावा अशी मागणी जोर धरते आहे. दरवर्षी बजेटमध्ये साधारण 8 ते 10 % ची वाढ होते. यंदाही बजेटचा आकडा 8 ते 10 %नी वाढेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी 33, 441 कोटींचा अर्थसंकल्प पालिकेने मांडला होता.


उत्पन्न वाढीचे नवे मार्ग शोधले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, आणि इतर सेवांसाठी अतिरीक्त कर लावला जाण्याची शक्यता आहे. भूमिगत टाक्या, अद्ययावत शिक्षण, कोस्टल रोड यांचा या अर्थसंकल्पात समावेश असेल. कोरोना सारख्या संकटाच्या अनुभवावरुन हेल्थ बजेट 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोस्टल रोड, मिठी नदी पर्यटन आणि पालिका शाळांमध्ये सीबीएसई-आयसीएसई बोर्डाच्या माध्यमातून अद्ययावत शिक्षणावर भर दिला जाण्याचा अंदाज आहे.


पूरमुक्तीसाठी भूमिगत टाक्या, माहुल व मोगरा ही नवी पंपिंग स्टेशन्स, मिठी नदी सौंदर्यीकरण असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते. मात्र मार्चमध्ये मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर झपाट्याने प्रसार वाढल्याने लॉकडाऊन जाहीर झाल्याचा फटका अनेक योजनांना बसला. या वर्षात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.


शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडसाठी पुन्हा भरीव तरतुद केली जाईल. कोस्टल रोडचे काम 2023 पर्यंत पूर्णत्वास नेण्यात येणार असल्यामुळे यासाठी मोठी तरतूद केली जाईल. याशिवाय सुरक्षित मुंबईसाठी पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट करणे, मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवणे, मीठी नदीचे सौंदर्यीकरण-बोटिंग, नद्यांचे पुनरुज्जीवन, फ्लड गेट वाढवणे यासह दर्जेदार सिमेंटचे रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.


‘बेस्ट’ला आर्थिक मदत


रेल्वेनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असणार्‍या ‘बेस्ट’ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिकेने आतापर्यंत सुमारे अडीच हजार कोटींची मदत केली आहे. यामध्ये गेल्यावर्षीच 1500 कोटींची मदत करण्यात आली. त्यामुळे यावर्षीही ‘बेस्ट’ला आर्थिक बळ देण्यासाठी मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.


अर्थसंकल्पात आणखी काय असेल?




  • कोविडच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात साथजन्य आजारांसाठी विशेष रुग्णालये

  • पालिकेचे दवाखाने संध्याकाळच्या वेळेतही सुरूच राहणार

  • अतिवृष्टीत पावसाचे पाणी साचवण्यासाठी भूमिगत टाक्या

  • नद्यांचे सौंदर्यीकरण, मिठी नदीमध्ये बोटिंग

  • समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी तरतूद

  • सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या नव्या शाळा सुरू करणे

  • स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी कचर्‍याची विल्हेवाट प्रकल्प, कचर्‍यापासून वीज प्रकल्प

  • पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना, पर्यावण संवर्धन उपक्रम

  • उत्पन्न वाढीसाठी कर्जरोखे तयार करणे

  • पुलांच्या मजबुतीसाठी, नवीन पुलांसाठी विशेष निधी, सीसीटीव्ही कॅमेरे