नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये रविवारी (5 जानेवारी) मास्कधारी हल्लेखोरांना राडा घातला होता. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी यावेळी जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोषलाही मारहाण केली. सर्व हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क लावले होते. जेएनयूतील हल्ला भ्याड आणि निंदनीय असून, हा हल्ला पाहून 26/11 मुंबई हल्ल्याची आठवण झाली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निषेध केला. तसंच जेएनयूसारखा प्रकार राज्यात होऊ देणार नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्याच्या केसांनाही धक्का लागणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिली. जेएनयू हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी 'मातोश्री' या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याचा निषेध केला होता.
अग्रलेखात काय म्हटलंय ?
चेहरे झाकलेल्या अज्ञात हल्लेखोर टोळीने ‘जेएनयू’मध्ये हिंसाचार केला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ‘जेएनयू’ विद्यार्थी संघटनेमधील वाद विकोपाला गेल्याचे हे चित्र आहे. चेहरे झाकून एक टोळके आत घुसले व त्यांनी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर हल्ला केला. त्यात शंभरच्या आसपास विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. तोंडावर बुरखा घालून काळोखात हल्ले करणे ही मर्दानगी नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे बुरखे उतरवण्याची गरज आहे. २६/११ चा मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी असेच तोंडे झाकून आले होते. आता ‘जेएनयू’त तेच चित्र दिसले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ही घटना आहे. गृहमंत्री अमित शहा सध्या दिल्लीतच आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा प्रचार करण्यासाठी ते घरोघरी सरकारी पत्रके वाटण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गृहमंत्र्यांवर ही काय वेळ आली आहे? ‘घर घर जागरुकता अभियाना’त स्वतः गृहमंत्री घरोघर पत्रके वाटत आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गोंधळ उडाला आहे व देशभरात त्यामुळे अस्थिरतेचा उद्रेक झाला. राज्याराज्यात लाखोंचे मोर्चे निघाले. हे मोर्चे फक्त मुसलमानांचे नव्हते. याप्रश्नी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी दरी पडेल व दंगली होतील अशी भाजपची आशा होती, ती फोल ठरली.
या कायद्याचा फटका अनेक राज्यांत हिंदूंनाही बसत आहे. त्यामुळे हिंदूही चिडले. या कायद्यामुळे ‘भाजप विरुद्ध बाकी सर्व’ अशी स्थिती निर्माण झाल्याने भाजपची गोची झाली आहे व त्याच सूडभावनेतून अनेक उपद्व्याप केले जात आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा ‘राडा’ त्याचाच एक भाग आहे काय? अशी शंका आता येत आहे. देशातील विद्यापीठे राजकारणापासून दूर राहणे गरजेचे आहे. येथे केवळ विद्यार्जनाचेच काम व्हावे असे भाजपने सांगितले आहे, पण गेल्या पाच वर्षांत विद्यापीठात राजकारण आणि हिंसाचार कोणी घुसवला? जे आपल्या विचाराचे नाहीत त्यांना उखडून टाकायचे व त्यासाठी सत्तेचा मस्तवाल वापर करायचा हे धोरण कोण राबवत आहे? नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध करणारे विद्यार्थी देशद्रोही आहेत, असे सांगणे हाच मुळी देशद्रोह आहे. दिल्लीतील विद्यापीठात असंतोष खदखदू लागला तेव्हा पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर बंदुका रोखल्या. गृहमंत्री अमित शहा यांचा असा आरोप आहे की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करून हिंसाचार भडकवला.
गृहमंत्र्यांनी हा आरोप पुराव्यासह जबाबदारीने केला असेल तर त्या पुराव्याच्या आधारे दंगल भडकविणाऱयांवर कारवाई व्हायला हवी. दंगलखोरांना अटक करायला तुम्हाला कोणी रोखले आहे? जेएनयू’त चेहरा झाकून जे घुसले ते ‘अज्ञात’ हल्लेखोर नाहीत. अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले हे हास्यास्पद आहे. देशात अराजकता निर्माण करणारे हे राजकारण धोकादायक आहे.
संबंधित बातम्या