मुंबई : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्लाचे देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ देशभरातील विद्यार्थी रस्त्यांवर उतरले आहेत. आज मुंबईतल्या विद्यार्थ्यांनीदेखील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करुन आपण जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या पाठिशी आहोत, असा संदेश दिला. तसेच भ्याड हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. परंतु या आंदोलनादरम्यान काही तरुण-तरुणींनी स्वतंत्र काश्मीरची (Free Kashmir) मागणी करणारे फलक उंचावले. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.
स्वतंत्र काश्मीरचा फलक घेऊन आंदोलनात सहभागी झालेल्या एका तरुणीचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्धी केला. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांनी ट्विटरद्वारे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. फडणवीस यांनी ट्वीट केले आहे की, हे आंदोलन नेमके कशासाठी? काश्मीर मुक्तीची घोषणा कशासाठी? मुंबईमध्ये अशाप्रकारचे फुटीरतावादी खपवून का घेतले जात आहेत? हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर घडत आहे. उद्धव ठाकरे तुमच्या नाकाखाली हे सगळं घडतंय. तुमच्या नाकावर टिच्चून फुटीरतावादी स्वतंत्र काश्मीरचा आणि भारताविरोधातला राग आळवत आहेत. तुम्ही हे का खपवून घेताय? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
जवाहरललाल नेहरू विद्यापीठात काल (05 जानेवारी)काही अज्ञात हल्लेखोरांनी चेहरे झाकून केलेल्या हल्ल्यात विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह अनेकजण जखमी झाले आहेत. हा हल्ला इतका भीषण होता की त्यात अनेकांची डोकी फुटली आणि हातपाय तुटले. अनेक विद्यार्थिनीदेखील त्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेचा निषेध म्हणून आज मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन केले होते. जेएनयू हल्ल्यातील आरोपींवर कारवाई करा आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना आळा घाला, अशी मागणी या आंदोलक विद्यार्थांनी केली आहे.
दरम्यान, मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियावर झालेल्या आंदोलनात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवारदेखील सहभागी झाले होते. गेटवेप्रमाणे मुंबईतल्या वांद्रे भागातही जेएनयू हल्ल्याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलनात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सहभागी झाले आहेत. अभिनेत्री दिया मिर्झा, तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप, गीतकार-अभिनेते स्वानंद किरकिरे, स्वरा भास्कर, हंसल मेहता आणि अनुभव सिन्हा या आंदोलनात सहभागी झाले आहेत.